त्या फसव्या जाहिरात विरोधात पोलिसात भाजपाची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:21 AM2021-05-28T04:21:48+5:302021-05-28T04:21:48+5:30
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा गैरवापर करून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फसव्या जाहिरात विरोधात चंद्रपूर महानगर ...
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा गैरवापर करून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फसव्या जाहिरात विरोधात चंद्रपूर महानगर भारतीय जनता पार्टी महामंत्री, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या विषयाची गंभीर दखल घेत, ती पोस्ट व्हायरल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर कायद्यातंर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या व्हॅट्सॲपवर बुधवारी एक मॅसेज आला. यात एका वेबसाईटची माहिती देण्यात आली होती. यामध्ये प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना २०२१ मध्ये नि:शुल्क नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. ही बाब भोंगळे यांनी महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार यांना सांगून त्याची चौकशी करून सत्य जाणून घेण्याचा सूचना केल्या, कासनगोट्टूवार यांनी त्या वेबसाईटवर जाऊन बघितल असता, तेथे पंतप्रधानांच्या नावाचा व फोटोचा वापर करीत, प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना २०२१ जाहीर करण्यात आली आहे. नोंदणी केल्यास,यात २०२१ मध्ये १० कोटी परिवाराला याचा लाभ मिळणार असून ५० कोटी पेक्षा अधिक लोकांना याचा लाभ मिळेल, असे स्पष्ट नमूद करण्यात आले. केंद्र सरकारद्वारे संचालित ही योजना असून १८ वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना २ हजार ५०० ते तीन हजार रुपये प्रतिमाह बेरोजगार भत्ता दिला जाईल, असे आश्वासन यात देण्यात आले. ऑनलाईन नोंदणीचा एक फॉर्मही येथे देण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष भोंगळे व नगरसेवक कासनगोट्टूवार यांनी यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे विचारणा केली असता,अशी कोणतीही योजना लागू केली नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्यानंतर नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेणे सुरू केले, असून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० कलम ४६८,माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ च्या कलम ६६ सी व डीनुसार गुन्हा नोंदविला आहे. अशा फसव्या जाहिरातीला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार यांनी केले आहे.