गोमातेवरून भाजपने फुटीरतेचे राजकारण बंद करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:15 AM2019-07-08T00:15:25+5:302019-07-08T00:16:08+5:30
भाजपच्या निवडणुकीचे तंत्र अगदी इंग्रजांसारखे आहे. त्यांनी गोमातेवरून फुटीरतेचे राजकारण करून देशभरात दुही निर्माण केली. हे बंद केले पाहिजे. मी जनसामान्यांच्या वेदना घेऊ न राजकारणात आलो, कष्टाने उभा झालो.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भाजपच्या निवडणुकीचे तंत्र अगदी इंग्रजांसारखे आहे. त्यांनी गोमातेवरून फुटीरतेचे राजकारण करून देशभरात दुही निर्माण केली. हे बंद केले पाहिजे. मी जनसामान्यांच्या वेदना घेऊ न राजकारणात आलो, कष्टाने उभा झालो. त्यामुळे भाजपच्या जनहितविरोधी धोरणावर मी सतत आवाज उठवत राहीन, असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी स्थानिक जैन भवनात आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी खासदार बाळू धानोरकर तर मंचावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार अविनाश वारजूकर, जि. प. सदस्य डॉ. सतीश वारजूकर, विनोद दत्तात्रेय, सुभाष गौर, संतोष लहामगे, मनपाचे माजी स्थायी समिती सभापती रितेश तिवारी, सुनिता अग्रवाल, संगिता अमृतकर, इंटकचे के. के. सिंग, मनिष कोत्तावार, सुमित वरारकर, राजेश अडूर व काँग्रेसच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार वडेट्टीवार म्हणाले, विरोधी पक्षनेता म्हणून मला कमी कालावधी मिळाला. परंतु या पदाचा प्रभावी वापर करून आगामी विधानसभा निवडणुकीत काँँग्रेसच्या विजयाची सुरूवात चंद्रपुरातून करणार आहे. काँग्रेसला दगा देऊन आधीच्या विरोधी पक्षनेत्याने भाजपचा हात धरला. त्याची आम्हाला पर्वा नाही. अधिवेशन काळात नऊ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे मी सभागृहात मांडली. सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे दोन मंत्र्यांना खुलासा करावा लागला. परंतु, मुख्यमंत्र्यांसह सात मंत्री मुग गिळून गप्प बसले होते. सत्तेचा वापर करून विरोधी पक्षांतील नेत्यांना धाकात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपच्या निवडणुकीचे तंत्र चांगले ठाऊ क असल्याने मी घाबरणारा नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले. राज्यातील ३० लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी मिळाला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्ष बदलला पण विचार जुनाच-बाळू धानोरकर
जनसेवेच्या राजकारणाचा वारसा शिवसेनेकडून मिळाला. पक्ष बदलवून आता काँग्रेसमध्ये आलो. पण विचार जुनाच (शिवसेना) असल्याची जाहीर कबुली खासदार बाळू धानोरकर यांनी अध्यक्षीय भाषणातून दिली. निवडणुका जिंकणे माझ्या हातचा खेळ असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, आमदार वडेट्टीवार यांनी सत्काराला उत्तर देताना ‘मीदेखील शिवसेनेत होतो. काँग्रेसमध्ये येऊन विचाराने बदललो. आता तुम्हीही बदला, असा सल्ला त्यांनी खासदार धानोरकर यांना दिला.
एक विकेट नव्हे, ‘आॅलआऊ ट’ करू
लोकसभा निवडणुकीत अवघ्या दहा-बारा दिवसांमध्ये प्रचाराची आखणी करून बाळू धानोरकर यांनी भाजपच्या प्रस्थापित नेत्याचा पराभव केला. त्यांच्या विजयामुळे राहुल गांधींनी मला विरोधी पक्षनेते पद दिले. येत्या निवडणुकीत भाजपची एक विकेट नव्हे तर ‘आॅलआऊ ट’ करू, असा दावा आमदार विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केला.