बर्फाची लादी चुकवताना झालेल्या अपघातात भाजपाच्या सोशल मीडिया सेलच्या सदस्याचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 11:24 AM2017-12-30T11:24:43+5:302017-12-30T11:28:36+5:30
जिल्ह्यातील नागभीड ते नागपूर मार्गावरील भुयार नजीक कार व टेम्पो मध्ये झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले.
चंद्रपूर - जिल्ह्यातील नागभीड ते नागपूर मार्गावरील भुयार नजीक कार व टेम्पो मध्ये झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळ हे भंडारा जिल्ह्यातील आहे.
मृतक अमोल कोंडबत्तूनवार हे सुधीर मुनगंटीवार यांचे समर्थक असून भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया सेल, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य , तथा जिल्हा संयोजक होते.
कोंडबत्तूनवार हे अन्य तिघांसह चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथून एमएच 34 एएम 7001 कारने नागभीड मार्गे नागपूरकडे जात होते. भुयार ओलांडताच रस्त्यावर कुणाचीतरी गाडीतून पडलेली बर्फाची लादी होती. ती चुकवून उजव्या बाजूने गाडी काढण्याचा प्रयत्न करताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम एच 34 बी जी 0018 क्रमांकाच्या टमाटर घेऊन येत असलेल्या टेम्पोवर धडकली. या भीषण अपघातात अमोल कोंडबत्तूनवार जागीच ठार झाला. तर अशोक संतोषवार, अविनाश दिलीप तल्लावार व जगन नानाजी संतोषवार तिघेही रा सावली हे गंभीर जखमी झाले. जखमींवर भिवापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून नागपुरला हलविले.
अमोल कोंडबतुनवार यांच्या निधनाने सच्चा कार्यकर्ता हरपला- सुधीर मुनगंटीवार
भाजपा चंद्रपूर जिल्हा संयोजक अमोल कोंडबतुनवार यांचे अपघाती निधन ही मनाला चटका लावणारी घटना असून त्यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे. एक सच्चा कार्यकर्ता हरपल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे . भारतीय जनता पार्टी अमोलच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे .
आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.