काँग्रेसच्या सभेत भाजप कार्यकर्त्यांचा धुडगूस
By admin | Published: February 14, 2017 12:33 AM2017-02-14T00:33:50+5:302017-02-14T00:33:50+5:30
जि.प. - पं.स. निवडणुकीसाठी धाबा-तोहोगाव क्षेत्रात बाहेरील विरूद्ध स्थानिक उमेदवार, या मुद्यावरून भाजप-काँग्रेसमध्ये रविवारी वाद झाला.
तिघांना अटक : बाहेरील उमेदवार मुद्यावरून घडला प्रकार
गोंडपिपरी : जि.प. - पं.स. निवडणुकीसाठी धाबा-तोहोगाव क्षेत्रात बाहेरील विरूद्ध स्थानिक उमेदवार, या मुद्यावरून भाजप-काँग्रेसमध्ये रविवारी वाद झाला. हिवरा येथे काँग्रेसच्या प्रचारसभेत भाजपच्या तीन कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली.
धाबा-तोहोगाव जिल्हा परिषद मतदार संघात काँग्रेसविरूद्ध भाजप अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी तीव्र झाल्या आहेत. काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी हिवरा येथे रविवारी सायंकाळी प्रचारसभा घेण्यात आली. सभेला अशोक रेचनकर, नामदेव सांगडे, हिवराचे उपसरपंच प्रकाश हिवरकर, सचिन फुलझेले आदी उपस्थित होते.
यावेळी तेथे भाजपचे सुधाकर गिरमा, जगदीश पुलगमकर व किसन ठाकूर हे मद्यधुंद अवस्थेत पोहोचले. त्यांनी वाद घालून सभा उधळण्याचा प्रयत्न केला. ‘आम्हाला पार्सलच पाहिजे’, अशा घोषणा ते देत होते. त्यांना समजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धाबाच्या ठाणेदार सरकटे यांना घटनेची माहिती दिली. पोलीस ताफ्यासह सरकटे तत्काळ घटनास्थळी पोहचले. याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या तिन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली.
त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. घटनेचे महसूल विभागाने चित्रिकरण केले आहे. (शहर प्रतिनिधी)
काँग्रेसकडून घटनेचा निषेध
धाबा-तोहोगाव मतदार संघात बाहेरील उमेदवार नको असे वातावरण तापले आहे. काँग्रेसतर्फे भाजपविरोधात प्रचार चालविला जात असल्याने हिवरा येथे भाजप कार्यकर्त्यांनी सभा उधळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार निषेधार्थ असल्याची टीका अशोक रेचनकरसह इतर कार्यकर्त्यांनी केली.
धुडगूस घालणारे भाजपचे कार्यकर्ते नाहीत. त्यांचा भाजपशी संबंध नाही. दारू पिऊन असे कृत्य केल्याने ते तळीराम आहेत. भाजपचे कार्यकर्ते असे कृत्य करीत नाहीत.
- बबन निकोडे,
तालुका अध्यक्ष, भाजपा, गोंडपिपरी.