काँग्रेसमुक्त म्हणणे भाजपाचा बालीशपणा
By Admin | Published: July 17, 2016 12:38 AM2016-07-17T00:38:52+5:302016-07-17T00:38:52+5:30
देशात व राज्यात सत्ता कााबीज करण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी भारतभर जाहीर सभेत जनतेला ‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखवित...
पत्रकार परिषद : माधव बिरजे यांची टीका
चिमूर : देशात व राज्यात सत्ता कााबीज करण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी भारतभर जाहीर सभेत जनतेला ‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखवित प्रत्येकांच्या खात्यात १०० दिवसांत १५ लाख रूपये टाकू, अशा प्रकारची अनेक खोटी आश्वासने दिली. जनतेने या आश्वासनावर विश्वास ठेवून भाजपाला सत्ता दिली. मात्र काही दिवसांतच भाजपाने निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनाकडे पाठ फिरवून जनतेची दिशाभूल केली. त्यामुळे येत्या काळात जनता भाजपाला सत्तेतून मुक्त करेल, असा आरोप करीत देशाला व चिमूर तालुक्याला काँग्रेसमुक्त करू असे म्हणणे भाजपाचा बालीशपणा असल्याची टीका तालुका काँग्रेस अध्यक्ष माधव बिरजे यांनी पत्रकार परिषदेत केली.
भाजपाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात कामाबाबतचा लेखाजोखा सांगताना भाजपा लाटेच्या परिवर्तनातून सत्तेवर आली. चिमूर विधानसभा क्षेत्रातही भाजपाचे कीर्तीकुमार भांगडिया निवडून आले. त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात चिमूर क्षेत्रात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांचे अनुदान, उन्हाळ्यातील अनेक गावातील भीषण पाणी टंचाई, नगर परिषद सीमेतील घरकूल, शौचालय, विहीर या लाभार्थ्यांचे काम होऊनही पैसे मिळत नाही. त्यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे.
कोट्यवधी रुपयांची कामे झाली म्हणून घोषणा करायच्या मात्र प्रत्यक्षात कुठेही फलकाशिवाय काही दिसत नाही. फक्त मीडियातूनच प्रसिद्धी करण्याचा सपाटा स्थानिक आमदार व भाजपाने चालविला आहे. स्थानिक नगरपरिषदेपासून पंचायत समिती व जिल्हा परिषदेत सुद्धा भाजपाचीच सत्ता आहे. पंचायत समितीची काय परिस्थिती आहे हे जनतेपासून लपून राहिले नाही. तेव्हा आगामी काळात जनताच त्यांना पूर्ण मुक्त करेल, असा आशावाद व्यक्त करीत चिमूर तालुका काँग्रेस मुक्त करू असे म्हणणे हा भाजपाचा बालीशपणाच असल्याचे पत्रकार परिषदेतून सांगितले.
यावेळी माजी आमदार डॉ. अविनाश वारजूरकर, माजी जि.प. अध्यक्ष तथा गटनेता डॉ. सतीश वारजूरकर, भीमराव ठावरी, नगरपरिषद सदस्य विनोद ढाकूनकर, अ. कदीर शेख, मनीष नंदेश्वर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)