निवडणूक खर्चात भाजपाची आघाडी कांँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 10:00 PM2019-04-01T22:00:32+5:302019-04-01T22:00:50+5:30
चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील निवडणूक खर्चात भाजपाने पहिल्या टप्प्यातच आघाडी घेतली तर कांँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील निवडणूक खर्चात भाजपाने पहिल्या टप्प्यातच आघाडी घेतली तर कांँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भाजपा उमेदवार हंसराज अहीर यांनी सोमवारपर्यंत २० लाख ८३ हजार ५७ रूपये, काँग्रेसचे बाळू धानोरकर १० लाख ३६ हजार ५३० रूपये आणि वंचित बहुजन आघाडीचे अॅड. राजेंद्र महाडोळे यांनी १ लाख ९४ हजार ५४० रूपये खर्च केल्याचे निवडणूक खर्च निरीक्षकांकडे दिलेल्या हिशेबातून पुढे आला आहे. निवडणूक खर्च निरीक्षक एम. के. बिजू यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रशासनाने सोमवारी उमेदवारांचा प्रचार खर्च व इतर खर्चाचे निरीक्षण केले. चंद्रपूर लोकसभा मतदार संघामध्ये भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार हंसराज अहीर व काँग्रेस- राकाँ युतीचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी खर्चाचा तपशील निवडणूक निरीक्षकांकडे सादर केला आहे. यामध्ये अहीर यांनी २० लाख ८३ हजार ५० रूपये खर्च झाल्याचे दाखविले आहे. मात्र, या खर्चात १४ लाख ७ हजार ८५७ रूपयांचा फरक जाणवत असल्याचा आक्षेप निवडणूक खर्च निरीक्षकांनी नोंदविला आहे. काँग्रेसचे धानोरकर यांनी सोमवारपर्यंत १० लाख ३६ हजार ५३० रुपयांचा खर्च दाखविला आहे. त्यांनी सादर केलेल्या खर्चातही १ लाख ४१ हजार ६३५ रूपयांची तफावत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. महाडोळे यांनी १ लाख ९४ हजार ५४० रूपयांचा खर्च दाखविला आहे. उमेदवारांनी प्रचार, सभा आणि रॅलीसाठी लागलेला खर्च शासकीय दरानुसार न दाखविता अतिशय कमी दाखविल्याचा आक्षेप निवडणूक खर्च निरीक्षकांनी घेतला आहे.
निवडणूक निरीक्षकांच्या समोर ११ उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तपासणी केली. यामध्ये काही उमेदवारांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार खर्चाचे दर लावले नाही. त्यामुळे या खर्चात तफावत आढळली आहे.
- अशोक माटकर, नोडल अधिकारी, निवडणूक खर्च विभाग.