जुगनाळा ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2015 01:31 AM2015-09-20T01:31:53+5:302015-09-20T01:31:53+5:30
ब्रह्मपुरी तालुक्यातील भाजपाचा गड समजल्या जाणाऱ्या चौगान पंचायत समिती गणाअंतर्गत येणाऱ्या जुगनाळा ग्रामपंचायतीमध्ये ...
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील भाजपाचा गड समजल्या जाणाऱ्या चौगान पंचायत समिती गणाअंतर्गत येणाऱ्या जुगनाळा ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचे सरपंच व उपसरपंच अविरोध निवडून आले. जुगनाळा ग्रामपंचायतीची नुकतीच सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून त्यात भाजपाचे नऊपैकी नऊ उमेदवार विजयी झाले. गोपाल ठाकरे, बंडु वाढई, मनिषा बगमारे, प्रमोद धोटे, पुष्पा तोंडरे, तानाजी मेश्राम, पूजा तोंडरे, दिपाली कोराम, जासुंदा टेंभूर्णे असे नऊ उमेदवार निवडून आले असून काँग्रेसप्रणित लेकचंद लिचडे गटाचा या निवडणुकीत पूर्णपणे धुव्वा उडाला. अन्नाजी ठाकरे व देविदास कार यांच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास सार्थक ठरविला. नुकत्याच पार पडलेल्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपाने दोन्ही पदावर कब्जा केला. सरपंचपदी गोपाल शालिकराम ठाकरे तर उपसरपंच म्हणून प्रमोद वसंतराव धोटे यांची अविरोध निवड झाली. युवकांचा भक्कम पाठिंबा असलेल्या गोपाल ठाकरे यांनी वयाच्या २८ व्या वर्षीच सरपंच पदाची धुरा सांभाळली. जनावरांचा कोंडवाडा, चौकांचे सौंदर्यीकरण, रस्त्याचे सिमेंटीकरण, वीज व पाणी यासोबतच सर्वांना न्याय देण्याचा मानस नवनियुक्त सरपंचांनी व्यक्त केला.