नगरपंचायतीमध्ये सत्तारुढ होण्यासाठी भाजपचा मार्ग मोकळा ?

By admin | Published: January 14, 2016 01:47 AM2016-01-14T01:47:44+5:302016-01-14T01:47:44+5:30

येथील ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त होताच प्रथमच पार पडलेल्या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत धक्कादायक निकाल पुढे आला.

BJP's way to become a ruling in Nagar Panchayat? | नगरपंचायतीमध्ये सत्तारुढ होण्यासाठी भाजपचा मार्ग मोकळा ?

नगरपंचायतीमध्ये सत्तारुढ होण्यासाठी भाजपचा मार्ग मोकळा ?

Next

पाच अपक्षांचे समर्थन : भाजपा जिल्हा सचिवांकडून मिळाली माहिती
गोंडपिंंपरी : येथील ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त होताच प्रथमच पार पडलेल्या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत धक्कादायक निकाल पुढे आला. यात भाजपला सर्वाधिक सहा, काँग्रेसला तीन, शिवसेना एक व अपक्ष सात अशा जागा वाट्याला आल्याने भाजप सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चितच झाले होते. याच दरम्यान काल मंगळवारी पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत भाजपला पाच अपक्ष उमेदवारांनी विनाशर्त पाठिंबा दिल्याने लवकर नगरपंचायतीमध्ये भाजप सत्तारुढ होणार, अशी माहिती जिल्हा सचिव बबन निकोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
गोंडपिंपरी नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया दोन दिवसांपूर्वी पार पडली. मात्र या निवडणुकीत मतदारांचा कौल हा अपक्ष उमेदवारांकडे अधिक असल्याने निकालात अपक्ष उमेदवारांची संख्या सर्वाधिक होती.
या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ तीन जागेवर समाधान मानावे लागले तर भाजपाला सर्वाधिक सहा जागा मिळाल्या. अतिशय चढाओढ व चुरशीची ठरलेल्या या निवडणुकीत काँग्रेस- भाजपा या दोन्ही पक्षातील काही उमेदवारांना अवघ्या काही मतांच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. अशातच भाजपाची भक्कम बाजू लक्षात घेत अपक्ष उमेदवारांपैकी पाच उमेदवारांनी भाजपाला समर्थन देण्याचे ठरवून सत्ता स्थापनेकरिता विनाशर्त मदत कार्य चालविल्याने येत्या काही दिवसातच भाजप सत्तारुढ होण्याची शक्यता वाढली आहे.
तत्पूर्वी काही नेते मंडळींनी भाजपला सत्तेपासून दूर लोटण्याकरिता अपक्षांची सांगड घालून सत्ता स्थापनेसाठी अनेक बैठका घेतल्या. मात्र तडजोड न जमल्याने अखेर तोडगा काढण्यात असमर्थ ठरलेल्यांनी माघार घेत भाजपचा मार्ग मोकळा करुन दिला आहे.
मागील आठवडाभरापासून शहरातील नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगततदार ठरली होती. आताही ही रंगत कायम आहे. राजकीय उलथापालथीचे अनेक समीकरणे मतदारांना या दरम्यान पहावयास मिळाले आहे. तर जिल्हा पातळीवरील नेत्यांचे मार्गदर्शन काही पक्षांना संजीवनी देणारेही ठरले, असे म्हणण्यास काही वावगे नाही. गेल्या दोन दिवसांपासून जादुई आकडा गाठण्यासाठी राजकीय तडजोडी सुरू झाल्या आहेत. तडजोडीच्या या राजकारणाबाबत मंगळवारी जिल्हा सचिव बबन निकोडे यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधला असता पाच अपक्षांच्या समर्थनांमुळे भाजपा गोटाचे संख्याबळ ११ वर पोहचले असल्याची कबुली त्यांनी दिली. तर नगराध्यक्ष कोण, असे विचारले असता त्यांनी नाव घेण्याचे टाळून लवकरच आपणास व नागरिकांना कळणार असेही ते म्हणाले. राजुरा विधानसभा क्षेत्रातील जिवती व कोरपना या नगरपंचायतींवर झेंडा फडकाविण्यात भाजपाला यश आले नाही, हे मात्र विशेष. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: BJP's way to become a ruling in Nagar Panchayat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.