काळी-पिवळीवरील प्रवासी विनामास्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:20 AM2021-06-20T04:20:08+5:302021-06-20T04:20:08+5:30
घोसरी : पोंभुर्णा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवासी विना मास्क सर्रास ये-जा करीत आहे. याकडे मात्र पोलिसांचे ...
घोसरी : पोंभुर्णा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवासी विना मास्क सर्रास ये-जा करीत आहे. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पोंभुर्णा तालुक्यातील नांदगाव-गोंडपिपरी, नवेगाव मोरे-पोंभुर्णा, पोंभुर्णा- मूल, पोंभुर्णा-चंद्रपूर, पोंभुर्णा- आक्सापूर-गोंडपिपरी मार्गावरून क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक सुरू आहे. या मार्गावरून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील अनेक प्रवासी विनामास्क असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती अनेकांनी व्यक्त होत आहे. याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
भद्रावती, राजुरा येथे संग्रहालय उभारा
राजुरा : जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भद्रावतीनगरी व निजामकालीन राजुरा शहरात ऐतिहासिक संग्रहालय उभारण्यात यावे. या भागातील ऐतिहासिक पाऊलखुणा जतन होतील. या माध्यमातून भावी पिढीला इतिहास समजण्यास सोपे होईल.
राष्ट्रीयीकृत बँकेअभावी ग्राहकांची गैरसोय
जिवती : तालुक्याचे ठिकाण असले तरी येथे राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेत येथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. या ठिकाणी एकही राष्ट्रीयीकृत बँक नाही. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत.
जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारले
पिंपळगाव (भो) : कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने जनसामान्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आले. सप्टेंबरपासून काही प्रमाणात सुरळीत सुरू झाले; परंतु फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढीला लागल्याने मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले. आता लॉकडाऊन शिथिल झाले असले तरी महागाई वाढली आहे. एकेकाळी ९० रुपयाला मिळणारे तेलाचे पॉकेट १५० रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अडचण होत आहे.
केरोसीनअभावी अडचण वाढली
जिवती : केरोसीनचा पुरवठा करणे शासनाने आता बंद केले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. मात्र केरोसीन बंद झाल्याने अडचण जात आहे. केरोसीन पुरविण्याची मागणी आहे.
येलापूर-येन्सापूर रस्त्याची दुरुस्ती करा
कोरपना : तालुक्यातील येलापूर, येन्सापूर, कारगाव, पिपरी, बाखर्डी ते नांदा आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बांधकाम विभागाने दुरुस्तीची कामे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
माणिकगड परिसरात पर्यटन सफारी सुरू करा
कोरपना : निसर्ग व वन संपदेने नटलेल्या माणिकगड परिसरात वन विभागाने पर्यटन सफारी सुरू करावी. तसेच येथील पर्यटनाला चालना द्यावी, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे. यामुळे रोजगार मिळणार आहे.
खैरगाव रस्त्याची निर्मिती करावी
कोरपना : शहरातील तलावापासून खैरगाव व शेतशिवाराकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून केली जात आहे. रस्ता झाल्यास नागरिकांसाठी सोईचे होणार आहे.
जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
आवळगाव ते कोसंबी रस्त्याची दुरवस्था
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव ते कोसंबी रस्त्याची अत्यंत दैना अवस्था झाली आहे. हा रस्ता कित्येक वर्षांपासून कच्चा असून, या संपूर्ण रोडची गिट्टी उखडलेली असून, मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.
वीज बिलामुळे सामान्य ग्राहक त्रस्त
घुग्घुस : महावितरण कंपनीकडून वारंवार वीज दरवाढ, अतिरिक्त शुल्क तर कधी अतिरिक्त सुरक्षा रक्कमेचे देयके पाठविली जात आहेत. या मनमानी कारभाराने त्रस्त असलेल्या वीज ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
चंद्रपूर-वणी मार्गावर पोलीस बंदोबस्त वाढवा
घुग्घुस : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मद्यपींकडून विविध मार्गाने दारू तस्करी सुरू आहे. पोलीस कारवाई करत आहे. परंतु, तस्करीच्या घटना वाढतच असल्याचे दिसून येते. आता तर पोलीस गस्त घालत असल्याची माहितीही तस्करांना मिळत आहे. आता पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी आहे.