विदर्भवाद्यांनी फडकविला काळा झेंडा
By admin | Published: May 2, 2017 01:00 AM2017-05-02T01:00:32+5:302017-05-02T01:00:32+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विदर्भवाद्यांनी काळा झेंडा सोमवारी फडकविला.
महाराष्ट्र दिन : विदर्भावरील अन्यायाचा निषेध
चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विदर्भवाद्यांनी काळा झेंडा सोमवारी फडकविला. तसेच विदर्भाचा झेंडा लावून विदर्भावरील अन्यायाला वाचा फोडण्यात आली. यावेळी अनेक विदर्भवादी उपस्थित होते.
१ मे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संयुक्त महाराष्ट्राचा स्थापना दिवस म्हणून मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथील हुतात्मा स्मारक येथे १०६ हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. त्याचवेळी विदर्भवाद्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा निषेध नोंदविला. गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातील खनिज संपत्ती आणि नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करून पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला. विदर्भाचा अनुशेषही आतापर्यंत पुर्ण करण्यात आलेला नाही.
विदर्भात खनिज संपत्ती असताना त्यावरील उद्योग मात्र पश्चिम महाराष्ट्र व मुंबई परिसरात स्थापन करण्यात आले. त्यामुळे विदर्भातील युवक बेरोजगार राहिले. या सर्व अन्यायाचा उल्लेख करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अॅड. वामनराव चटप यांनी काळा झेंडा फडकविला.
यावेळी विदर्भ राज्य झालेच पाहिजे अशा घोषणा देवून विदर्भावरील अन्यायाचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.
तत्पूर्वी विदर्भाचे खंदे समर्थक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मार्ल्यापण करून अभिवादन करण्यात आले. या आंदोलनामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर पोतनवार व शहराध्यक्ष अनिल दिकोंडवार सहभागी झाले.
यावेळी कपिल इद्दे, मधुकर चिंचोलकर, मारोती येरणे, रामेश्वर महाजन, मन्सूरभाई, अनिल बाळ सराफ, वैभव रामेडवार, प्रवीण मोरे, हिराचंद बोरकुटे, रमेश मानकर, चेतन रावते, मितीन भागवत, नथ्थूजी महाजन, चुनारकर, गोपी मित्रा वसंत चांदेकर, मुक्तानंद भोंगळे, मारोतराव बोथले, अॅड. चेताली बोरकुटे, प्रा. माधव गुरनुले, दिवाकर माणुसमारे, अजय आंबेकर, महादेव बोरेकर, बाबा कडूकर, भय्या रामटेके, रामचंद्र पेंढारकर, ए. रामकुमार, पुंडलक गोठे, पठाण आदी विदर्भवादी संपूर्ण जिल्ह्यातून उपस्थित होते. (प्रतिनिधी)