चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखूचा काळाबाजार तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 05:00 AM2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:01:10+5:30

वरोरा व चंद्रपूर हे सुगंधित तंबाखूचे अवैध आगारच बनले असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी वरोऱ्यात कारवाई झाली होती. मात्र ही कारवाईदेखील थातुरमातूर असल्याची चर्चा आता ऐकायला येत आहे. याचा खोलवर जावून छडा लावला तर मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यताही सूत्राने वर्तविली आहे.

Black market of aromatic tobacco is booming in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखूचा काळाबाजार तेजीत

चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखूचा काळाबाजार तेजीत

googlenewsNext
ठळक मुद्देवरोरा व चंद्रपूर अड्डा : कारवाया केवळ नाममात्रच

राजेश भोजेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊननंतर जिल्ह्यातील पान व खर्रा दुकाने एकाएकी बंद करण्यात आली. मात्र शौकिणांना खर्रा मिळणे बंद झाले नाही. मग खर्रा बनविण्यासाठी हा सुगंधित तंबाखू येतो कुठून? असा सवाल प्रत्येकांना पडला आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार वरोरा व चंद्रपूर हे सुगंधित तंबाखूचे अवैध आगारच बनले असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी वरोऱ्यात कारवाई झाली होती. मात्र ही कारवाईदेखील थातुरमातूर असल्याची चर्चा आता ऐकायला येत आहे. याचा खोलवर जावून छडा लावला तर मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यताही सूत्राने वर्तविली आहे.

जिल्हा प्रशासनाने शहरातील जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने उघडण्याला परवानगी दिली आहे. सुंगधित तंबाखू व त्यापासून बनविलेला खर्रा हा जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडत नाही. शिवाय एखाद्या कोरोनाबाधिताने खर्रा खावून थुंकल्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असते. गंभीर बाब म्हणजे खर्रा विकणारा हा दररोज शेकडो खर्रा शौकिनांच्या संपर्कात येत आहे. अशातच त्याला एखाद्यामुळे कोरोनाची बाधा झाल्यास सध्या आटोक्यात असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला कोरोनाचा विळखा पडला तर नवल वाटू नये, अशी स्थिती आहे. खर्रा विक्रेत्यांना छुप्या मार्गाने सुगंधित तंबाखू मिळत असल्यामुळेच तो खर्रा विक्री करीत आहे. हा सुगंधित तंबाखू कुठून मिळतो, याची माहिती त्यावर कारवाई करणाºया विभागालाच चांगली माहिती आहे. मग तरीही सुगंधित तंबाखू विकला जात असल्याचे चित्र आहे. हा विभाग हे सगळे डोळे मिटून बघतो आहे. याचे रहस्य न समजण्यासारखे नाहीच.

दरातील वाढ कुणाच्या पथ्यावर
ही दरवाढ सुगंधित तंबाखूचा काळाबाजार असाच बिनदिक्कत सुरू राहण्यासाठी आकारला जात असल्याचे समजते. बाजारात तीन ते चार प्रकारचा सुगंधित तंबाखू येत आहे. २०० ग्रॅमच्या एका नामांकित कंपनीच्या डब्यावर ७५० रुपये दर अंकीत असताना तो काळ्या बाजारात २४०० ते २५०० रुपयाने विकला जात असल्याचे काही छुप्या मार्गाने खर्रा विकणाऱ्यांचे म्हणणे आहे.

असा मिळतो खर्रा
खर्रा विक्रेते घरीच खर्रा बनवितो. तो एका पिशवीत घेऊन नेहमी ठरलेल्या परिसरात उभा राहून आपले ग्राहक हेरत असतो. काहींनी आपल्या ग्राहकांना आपला मोबाईल क्रमांकही सहज सुविधेसाठी दिलेला आहे. तो तिथे दिसला नाही तर फोन करून अपडेट घेतो आणि खर्रा मिळण्याची वेळ निश्चित केली जाते. कारवाई करणारेही यांचे मोठ्या प्रमाणावर ग्राहक आहे.

तंबाखूवर कोट्यवधींची उलाढाल
चंद्रपूर जिल्ह्यातील खर्रा विक्रेत्यांकडून सुगंधित तंबाखूची मागणी एकाएकी वाढल्यामुळे सुगंधित तंबाखूचा दर अव्वाच्या सव्वा झाला आहे. यामुळे खर्ऱ्याचा दर वाढवावा लागला असल्याचे खर्रा विक्रेते आपल्या शौकिन ग्राहकांना खासगीत सांगत आहे. लॉकडाऊननंतर चंद्रपूर जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल या छुप्या मार्गाने सुरू असलेल्या व्यवसायात झाल्याचे जाणकार सूत्राचे म्हणणे आहे.

सुगंधित तंबाखूची तीनपट भावाने विक्री
सुगंधित तंबाखूवर बंदी घातल्यानंतर खर्रा विक्री राजरोसपणे सुरूच होती. तरीही तंबाखूचा दर डब्यावर असलेल्या दरापेक्षा अधिक वसूल करीत होते. आता या बंदीची अंमलबजावणी कडक केल्यामुळे सुगंधित तंबाखू होलसेलमध्ये विकणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. एक दोन नव्हे तर तब्बल तीनपट दराने ही विक्री बिनदिक्कत सुरू असल्याची सूत्राची माहिती आहे.

Web Title: Black market of aromatic tobacco is booming in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.