प्रकरण मिटविण्याच्या नादातच पेटला गोंडपिपरीतील ‘झेंडा वाद’

By admin | Published: October 3, 2015 01:01 AM2015-10-03T01:01:32+5:302015-10-03T01:01:32+5:30

येथील बहुचर्चित झेंडा वाद मिटविण्याच्या प्रयत्नातच अधिक पेटल्याची चर्चा आता शहरात होऊ लागली आहे. या एकूणच प्रकरणात आता अधिकाऱ्यांना टार्गेट केले जात आहे.

Blasphemy 'flagged issue' | प्रकरण मिटविण्याच्या नादातच पेटला गोंडपिपरीतील ‘झेंडा वाद’

प्रकरण मिटविण्याच्या नादातच पेटला गोंडपिपरीतील ‘झेंडा वाद’

Next

दोन वर्षातील दुसरी घटना : अधिकारीच ठरले ‘टार्गेट’
वेदांत मेहरकुळे गोंडपिपरी
येथील बहुचर्चित झेंडा वाद मिटविण्याच्या प्रयत्नातच अधिक पेटल्याची चर्चा आता शहरात होऊ लागली आहे. या एकूणच प्रकरणात आता अधिकाऱ्यांना टार्गेट केले जात आहे.
शहरातील बाजार मार्गावरील स्थित हनुमान मंदिरातील शिवलिंग हनुमान मूर्तीची तोडफोड करून अज्ञात समाजकंटकाने विटंबना केली. ही घटना सोमवारच्या सकाळी नागरिकांना लक्षात येताच संपूर्ण गावात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरून घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी नागरिक एकत्र आले. याच दरम्यान, गावात बंदचे आवाहन करण्यात आले. तसेच नागरिकांनी गावातील प्रमुख राज्यमार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात केली. शहरात सर्वत्र तणावाची परिस्थिती असताना पोलिसांकडून प्रकरणाचा निपटारा करताना झालेली चूक ही जनतेच्या रोषाचे कारण होऊन ‘झेंडा’ या नव्या वादाला प्रारंभ झाला आणि गत काही वर्षापूर्वी इतिहासजमा असलेल्या मूर्ती विटंबना प्रकरणाची पुनरावृत्ती झाली. कुठल्याही धर्मासंबधातील विटंबना हा निंदनिय प्रकार आहे. मात्र समाजातच वावरणाऱ्या काही समाजकंटकांकडून असा अनुचित प्रकार घडणे ही विकृतीच म्हणावी लागेल.
तत्पूर्वी तालुक्यातील अशाच एका घटनेचा आढावा घेतल्यास गत काही वर्षांपूर्वी तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या तामसा (खु) गावाजवळील वैनगंगा तिरावर शिवमंदीर आहे. तेथील शिवलिंगाची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती. याची वार्ता तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पसरताच, त्या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी जमून वैनगंगा नदी तिरावरही आंदोलन पेटले. यावेळी गोंडपिपरीचे तत्कालिन तहसिलदार मदन खाडीलकर हे प्रकरणाचा निपटारा व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास पोहचले. दुभंगलेल्या मूर्तीची डागडुजी करून पुन्हा पूजा करावी, असा सल्ला देऊन ते तेथून निघाले आणि वादाला तोंड फुटले. नागरिकांच्या भावना अनावर होवून आंदोलन भडकले. या घटनेचे पडसाद म्हणून खाडीलकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.
सोमवारी गोंडपिपरीत घडलेल्या निंदनिय घटनेत पोलिसांनी जर मागील घटनेचा आढावा घेतला असता तर निश्चितच ‘झेंडा वाद’ पेटला नसता. सोमवारी शहरातील नागरिक मूर्तीची विटंबना झाल्यानंतर निषेध नोंदविण्यासाठी रस्त्यावर आले. नागरिकांचे आंदोलन अहिंसक पद्धतीने सुरू असताना पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे यांच्या वाहनातून आलेल्या शिपायाने पुढे येऊन आंदोलकांच्या हातातील झेंडा हिसकावून तो मोडण्याचा प्रयत्न केला. तेथूनच नव्या वादाला तोंड फुटले. यावेळी पोलिसांनी जर संयम बाळगून नागरिकांची समजूत घातली असती तर वाद उफाळला नसता. मूर्ती विटंबनेसारखे निंदनिय प्रकरण घडवून आणणाऱ्यांना धडा शिकविणे ही काळाची गरज आहे.
आजघडीला झेंडा वादामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यात दरी निर्माण झाली आहे. झेंडा वादाचे मुळ ठरणाऱ्या पोलीस शिपायासोबतच ठाणेदार बोत्रे यांच्यावरही कारवाईची मागणी करण्यात आली. तसेच प्रकरणाचे दुसरे दिवशी येथीलच एका हॉटेल व्यवसायिकाला आंदोलनातील प्रमुखांपैकी एक असल्याचे सांगून पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. त्याला दमदाटी करण्याचा प्रतापही पोलिसांकडून करण्यात आल्याचे त्या युवकाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या सर्व प्रकरणात ठाणेदार बोत्रेसह शिपाई मनोज धकाते याची तडकाफडकी बदली झाल्याची शहरात चर्चा आहे.या मूर्ती विटंबनेच्या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित आरोपीचा शोध घ्यावा व त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Web Title: Blasphemy 'flagged issue'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.