मनपाच्या सभेत धक्काबुक्की

By admin | Published: September 29, 2016 12:50 AM2016-09-29T00:50:31+5:302016-09-29T00:50:31+5:30

महानगरपालिकेच्या यापूर्वीच्या आमसभा पाणी पुरवठ्यामुळे वादळी ठरत आल्या आहेत.

Blast in the meeting of the MMP | मनपाच्या सभेत धक्काबुक्की

मनपाच्या सभेत धक्काबुक्की

Next

करवाढ मागे घ्या : आमसभा काही वेळासाठी तहकूब
चंद्रपूर : महानगरपालिकेच्या यापूर्वीच्या आमसभा पाणी पुरवठ्यामुळे वादळी ठरत आल्या आहेत. आता मालमत्ता करावरून नगरसेवकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. हाच संताप आज बुधवारी आयोजित मनपाच्या आमसभेतही व्यक्त झाला. मालमत्ता करवाढीला स्थगिती देण्याचा ठराव झाला असतानाही प्रशासनाने नवीन दरानेच पावत्यांचे वितरण केले. यावरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की झाली. यानंतर महापौरांनी दहा मिनिटे सभा स्थगित केली. मात्र यासंदर्भात कोणताच निर्णय न झाल्याने काँग्रेस नगरसेवकांनी महापौरांचा निषेध करीत सभेतून बहिर्गमन केले.
चंद्रपूर शहरात अनेक समस्या आहेत. याचे निराकरण करण्यासाठी आमसभेत चर्चा करून हिताचा निर्णय घेतला जातो. मात्र आमसभेत अनेक विषयावर वादंग निर्माण होऊन विषय तसाच कायम राहतो. सध्या प्रशासनाने नवीन दर लावून मालमत्ताधारकांना नोटीस बजावल्या आहेत. यामुळे नागरिकांत संताप असल्याचे नगरसेवक प्रशांत दानव यांनी सभागृहात सांगितले. करवाढ मागे घ्या, नंतरच सभागृहाचे कामकाज सुरु करा, अशी भूमिका काँग्रेस नगरसेवकांनी घेतली. त्यानंतर वेलमध्ये जाऊन निषेध नोंदविला. भाजप नगरसेवकही हे भांडण बंद करण्याची मागणी करीत वेलमध्ये आले. यावेळी महेंद्र जयस्वाल आणि राजेश अडूर यांच्यात धक्काबुक्की झाली. यानंतर सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकारानंतर महापौरांनी सभा स्थगित केली. दहा मिनिटांनंतर सभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले. पुन्हा हाच विषय चर्चेला आला. प्रशासनाने ठरावाची अंमलबजावणी केली नसल्याचा ठपका महापौरांनी प्रशासनावर ठेवला. अंजली घोटेकर यांनी निषेध नोंदवित करवाढीला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप केला. यानंतर सर्वच नगरसेवकांनी करवाढ मागे घेण्याची मागणी केली. महापौरांनी २०१६-१७ पर्यंत जुन्या दरानुसार करवसुली करण्यात यावी. नवीन दर २०१७-१८ या वर्षांपासून लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले. मालमत्ता करवाढीचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याच्या उद्देशातून दोन सदस्यीय समिती गठीत करण्याचे ठरले. काँग्रेस नगरसेवक नंदू नागरकर, नगरसेवक गजानन गावंडे यांचा त्यात समावेश राहील, असे ठरले. मात्र दोन्ही नगरसेवकांनी सहभागी होण्यास नकार दर्शविला. काँग्रेस नगरसेवक जबाबदारी घेत नाही. चांगल्या कामाला हेतुपुरस्पर विरोध करतात, असे महापौर राखी कंचर्लावार यांनी बोलताना सांगितले. आमसभेला महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंत देशमुख, स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, आयुक्त संजय काकडे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

सैनिकांच्या विधवांना सूट
संरक्षण दलात शौर्य पदक असलेल्या तसेच माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ताकरात सूट देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. वापरात असलेल्या एका निवासी इमारतीला सूट दिली जाईल. यासाठी संबंधितांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.

महापालिका प्रशासनाकडून स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. यासाठी स्वच्छतादूत नेमण्याचा प्रस्ताव एक महिन्यापूर्वी मंजूर झाला. मात्र, अजूनपर्यंत स्वच्छतादूत नेमण्यात प्रशासनाला यश आले नसल्याचा आरोप नगरसेवक संजय वैद्य यांनी केला. सिनेअभिनेते विवेक ओबेरॉय यांना स्वच्छतादूत म्हणून नियुक्त केले जाणार असल्याचे महापौर राखी कंचर्लावार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Blast in the meeting of the MMP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.