ब्रह्मपुरी ठाणेदाराच्या आशीर्वादाने अवैध धंदे व दारूचा महापूर
By admin | Published: April 11, 2017 12:48 AM2017-04-11T00:48:33+5:302017-04-11T00:48:33+5:30
ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात ओ. बी. अंबाडकर हे पोलीस निरीक्षक आणि ए.टी. खंडाळे हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून रूजू झाल्यापासून ....
विजय वडेट्टीवार : कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन
चंद्रपूर : ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात ओ. बी. अंबाडकर हे पोलीस निरीक्षक आणि ए.टी. खंडाळे हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून रूजू झाल्यापासून ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून राजरोसपणे दररोज लाखो रुपयांची अवैध दारूची विक्री होत आहे. तसेच मटका व सट्टा यासारखे अवैध धंदे जोरात सुरू असून गुंडागर्दीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या तालुक्यातील रक्षक असलेले पोलीसच भक्षक म्हणून वावरत आहेत. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील अवैध दारूची विक्री तसेच अवैध धंदे तातडीने बंद करू संबंधित ठाणेदाराची इतरत्र बदली करावी. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करून हजारो नागरिकांना न्याय द्यावा अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष तथा विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे उपगट नेता आमदार विजय वडेट्टीवार यांनी पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केले आहे.
आ. वडेट्टीवार यांनी निवेदनात म्हटले आहे की, १ एप्रिल २०१५ रोजी राज्य शासनाकडून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. या दारुबंदी जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या सिमेला लागून भंडारा आणि नागपूर जिल्ह्याची सीमा आहे. हे दोन्ही जिल्हे दारू बंदी नसल्यामुळे या भंडारा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये असलेल्या देशी व विदेशी दारूच्या ठोक आणि चिल्लर दुकानदाराकडून दारूचा मोठ्या प्रमाणात पुरवठा ब्रह्मपुरी शहरासह तालुक्यामध्ये अवैधरित्या केल्या जात असून ब्रह्मपुरी पोलीस ठाणेदाराच्या आशीर्वादाने व संगनमताने प्रत्येक १०० ते ५०० मीटर अंतरावर दामदुप्पटीने देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री सुरू आहे. त्यामुळे शेकडो नागरिकांचे संसार उध्वस्त झाले असून युवा पिढी बरबाद होत आहे.
या अवैध धंदेवाल्याकडून ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यातील ठाणेदारासह काही कर्मचाऱ्यांना महिन्याकाठी किमान २० ते २५ लाख रुपये अवैधरीत्या प्राप्त होत आहे. ब्रह्मपुरीचे ठाणेदार ओ.पी. अंबाडकर यांच्या आशिर्वादाने भंडारा जिल्ह्यातून ठोक व चिल्लर दारू विक्रेत्याकडून राजरोसपणे अनेक वाहनातून ब्रह्मपुरी शहरासह तालुक्यात पुरवठा केल्या जात आहे. या अवैध धंद्यात नुकूल सेलोकर (ब्रह्मपुरी), अनिल गेडाम (वडसा), सज्जाद (कुरखेडा) यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. या अवैध धंदेवाल्याचे वाहन सुखरूपपणे येण्याकरिता ठाणेदार पी. अंबाळकर यांच्या तोंडी आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक ए.टी. खडाळे यांची खास नियुक् केल्या जात आहे.
ए.टी. खंडाळे यांचे वाहन सबमोर आणि अवैध दारूने भरलेली गाडी मागे येवून ब्रह्मपुरी शहरासह तालुक्यात लाखो रुपयांचा अवैध दारूचा पुरवठा होत आहे. नागरिकांचा सयम तुटल्यास केव्हाही जनआंदोलन होऊन कायदा व सुव्यवस्थेवर याचा विपरित परिणाम पडू शकतो. त्यामुळे, या अवैध धंद्यावर तातडीने आळा घालून अवैध धंदेवाल्यांना साथ देणाऱ्या ठाणेदाराला निलंबित करण्यात यावे किंवा त्याचा इतरत्र बदली करून या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय अधिकाऱ्यामार्फतीने चौकशी करून संबंधितांवार कारवाई करून माझ्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील हजारो नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी आ. वडेट्टीवार यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)