राज्यातील ३३६ रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 05:52 AM2019-12-01T05:52:25+5:302019-12-01T05:52:38+5:30
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत ३३६ रक्तपेढ्या सुरू आहेत.
- राजेश मडावी
चंद्रपूर : दोन आठवड्यांपासून राज्यभरातील ३३६ रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने उपचाराअभावी हजारो रूग्णांचे हाल होत आहेत. रक्तपेढ्यांना दिलेल्या उद्दिष्टानुसार अपेक्षित रक्तसंकलन होत नसल्याने राज्य रक्त संक्रमण परिषदेनेही चिंता व्यक्त केली आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत ३३६ रक्तपेढ्या सुरू आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयासह विविध रूग्णालयांमध्ये दररोज किमान ५००० ते ६००० रक्ताच्या पिशव्यांची मागणी केल्या जात आहे. परंतु, रक्तपेढ्यांमध्ये मागणी करूनही रक्त मिळत नसल्याने रूग्णांचे कुटुंबीय हतबल आहेत. यावर्षी आॅक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांत दिवाळी सणासुदीचा कालखंड होता. सलग सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबिरांची संख्या रोडावली. रक्तदान शिबिरांची संख्या घटल्याने रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध होण्याचा मार्गच बंद झाला. राज्यातील बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये १० ते १२ दिवस पुरेल इतक्याच रक्ताच्या पिशव्या उपलब्ध असल्याची माहिती सूत्राने दिली.
राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला, हे खरे आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपरिषद आदींसह शासनाच्या विविध विभागांनी रक्तदान श्ाििबरांचे आयोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. आरोग्य विभागाकडून यासाठी विशेष प्रयत्न केल्या जात आहे.
-डॉ. अरूण थोरात, सहाय्यक संचालक रक्त संक्रमण परिषद, मुंबई