स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरिता रक्तस्वाक्षरी आंदोलन
By admin | Published: May 2, 2017 12:58 AM2017-05-02T00:58:13+5:302017-05-02T00:58:13+5:30
स्थानिक जनता महाविद्यालयाच्या समोरील पटांगणावर आज सोमवारी विदर्भ राज्याचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्य करा, ...
चंद्रपूर : स्थानिक जनता महाविद्यालयाच्या समोरील पटांगणावर आज सोमवारी विदर्भ राज्याचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्य करा, या मागणीसाठी रक्तस्वाक्षरी आंदोलनही करण्यात आले.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती करताना विदर्भाचा समावेश करण्यात आला. तेव्हापासून विदर्भावर सातत्याने अन्याय होत आलेला आहे. विदर्भाचा विकास करताना वेळोवेळी दुर्लक्ष झाल्याने विदर्भातील विविध क्षेत्रातील अनुशेष कायम वाढतच चालेला आहे. विदर्भाचा विकास करावयाचा असल्यास तर त्याला उत्तर फक्त स्वतंत्र विदर्भ राज्य हेच आहे. याकरिता अनेक विदर्भवादी संघटना स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी लढा देत आहेत. याचाच एक भाग म्हणून दरवर्षी विदर्भ राज्याचे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.
१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरिता दरवर्षी प्रमाणे यंदाही विदर्भ राज्याचे ध्वजारोहण कार्यक्रम विदर्भ राज्य आघाडी, चंद्रपूर विदर्भ कनेक्ट, चंद्रपूर व चांदा शिक्षण प्रसारक मंडळ तसेच अनेक विदर्भवादी संघटनाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहण कार्यक्रमासोबत रक्त स्वाक्षरी आंदोलन व रक्तदान शिबिरही घेण्यात आले. अॅड. श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात संपूर्ण विदर्भात सुरु असलेल्या रक्तस्वाक्षरी आंदोलनातील निवेदने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येणार आहे. यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात विदर्भवादी कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. ध्वजारोहण प्राचार्य अशोक जिवतोडे यांच्या हस्ते झाले. ध्वजारोहण होताच जय विदर्भ, विदर्भ राज्य झालेच पाहिजे आदी घोषणांनी परिसर निनादून गेला. त्यापूर्वी उपस्थित नागरिकांना विदर्भ राज्याची शपथ देण्यात आली. यावेळी विदर्भ कनेक्टचे जिल्हा संयोजक बंडू धोतरे, विदर्भ राज्य आघाडीचे जिल्हा संयोजक नितीन रामटेके, विनोद दत्तात्रय, प्राचार्य डॉ. एम सुभाष मालेकर, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मोहीतकर, माजी प्राचार्य शामसुंदर धोपटे, सुधाकर अडबाले, किशोर ठाकरे, प्रा. योगेश दुधपचारे, मधुकर जिझीलवार व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)