रक्त संक्रमण अधिकाऱ्यांनी केला प्लाझ्मा दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:28 AM2021-05-10T04:28:12+5:302021-05-10T04:28:12+5:30
फोटो : प्लाझ्मा दान करताना डाॅ. अनंत हजारे चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्त संक्रमण अधिकाऱी म्हणून कार्यरत ...
फोटो : प्लाझ्मा दान करताना डाॅ. अनंत हजारे
चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्त संक्रमण अधिकाऱी म्हणून कार्यरत असलेले डाॅ. अनंत हजारे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्लाझ्मा दान करीत नवा आदर्श निर्माण केला आहे. कोरोनातून बरे झालेल्या अधिकाधिक नागरिकांनी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये तब्बल १५ जणांनीही प्लाझ्मा दान केला आहे.
कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. मात्र, कोरोना आजारातून बरे होता येते. रुग्णांनी तसेच नातेवाईकांनी घाबरू नये. असे आवाहन वारंवार केले जात आहे. दरम्यान, गंभीर रुग्णांना प्लाझ्मा दान देवून यातून बरे करता येते. यासाठी कोरोनातून बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. मात्र, पाहिजे तसे नागरिक यासाठी पुढे येत नसल्याने रक्तसंक्रमण अधिकारी डाॅ. हजारे यांनी आपल्या वाढदिवशी प्लाझ्मा दान केला आहे. विशेष म्हणजे, त्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये कोरोनाची लागण झाली होती. यावर मात करून त्यांनी पुन्हा आपले कार्य सुरू केले. त्यानंतर अधिकाधिक नागरिकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी जनजागृती सुरू केली असून यासाठी त्यांनी स्वत: प्लाझ्मा दान केला. यावेळी विकृती शास्त्र विभागप्रमुख डाॅ. सुरेश जांभूळकर, नाक, कान, घसा विभागप्रमुख डाॅ. देवेंद्र माहूरे, बालरोगतज्ज्ञ डाॅ. सरिता हजारे, समाजसेवा अधीक्षक संजय गावित, पंकज पवार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी वर्षा देशमुख आदींची उपस्थिती होती. प्लाझ्मा घेण्याचे काम रक्तपेढी वैद्यानिक अधिकारी जयवंत पचारे यांनी केले.
बाॅक्स
घाबरू नका, प्लाझ्मा दान करा
प्लाझ्मा दान करण्यासाठी आजही नागरिक घाबरत आहेत. मात्र घाबरू नका, यातून कोणताही त्रास होत नसल्याचे स्पष्ट करून शरीरातील केवळ प्लाझ्मा घेतला जातो. यामुळे कोणताही त्रास किंवा कमजोरी येत नाही. ही सोपी पद्धत असून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्रथम रक्तकेंद्रात केवळ ५ एम.एल. रक्त द्यावे लागते. त्यानंतर रक्त तपासणीकरिता पाठवून त्यांच्या रक्तातील रोगप्रतिकारशक्तीची चाचणी केली जाते. चाचणी केल्यानंतर प्लाझ्मा देता येते.
बाॅक्स
४० वर्षांपासून रक्तदान
येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रक्तसंक्रमण अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डाॅ. अनंत हजारे यांनी मागील ४० वर्षांपासून वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. तो अद्यापही सुरूच आहे. यावर्षी त्यांनी प्लाझ्मा दान केला आहे.
बाॅक्स
१५ जणांनी दिला प्लाझ्मा दान
कोरोनाच्या या महामारीने गंभीर रुग्णांना वाचविण्यासाठी प्लाझ्मा दिला जातो. मागील काही दिवसांमध्ये येथील रुग्णालयात कोरोनातून बरे झालेल्या १५ जणांनी प्लाझ्मा दान करून अन्य रुग्णांचा जीव वाचविला आहे.