फुलकिड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी पुत्रांनी केली निळ्या सापळ्यांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2022 03:07 PM2022-10-28T15:07:54+5:302022-10-28T15:08:07+5:30

शेतीचे नुकसान वाचवण्यासाठी निळे सापळे फायदेशीर

Blue traps were created by farmers' to prevent the infestation of flower bugs | फुलकिड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी पुत्रांनी केली निळ्या सापळ्यांची निर्मिती

फुलकिड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी पुत्रांनी केली निळ्या सापळ्यांची निर्मिती

Next

प्रकाश काळे

गोवरी (चंद्रपूर) : अस्मानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. पावसामुळे यंदा सोयाबीन पिकांना चांगलाच फटका बसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. राजुरा तालुक्यामध्ये कापूस पिकांसह मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली जाते; परंतु, बदलत्या वातावरणामुळे मागील दोन वर्षांपासून मिरची पिकावर मोठ्या प्रमाणात रोगांचा विशेषता फुलकिडे (थ्रीप्स) चा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. मागील वर्षी इंडोनेशियातून आलेल्या काळ्या फुलकिड्यामुळे आंध्रप्रदेश, तेलंगणासह चंद्रपूर जिल्ह्यातील मिरचीचेसुद्धा नुकसान झाले होते. त्याचा शेतीला मोठा फटका बसला आहे.

राजुरा तालुक्यातील पंचाळा येथील शेतकरीपुत्र अमोल भोंगळे, देवानंद गिरसावळे व मारडा येथील भाविक पिंपळशेंडे यांनी काळ्या फुलकिड्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी शक्कल लढवित निळ्या सापळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. काळ्या फुलकिड्याचे जीवनचक्र अभ्यासून त्याला अडकवण्यासाठी निळ्या रंगाचे प्रकाश सापळे तयार केले आहे. कुठलाही फुलकिडा हा निळ्या रंगाकडे पटकन आकर्षित होतो. याच गोष्टीचा फायदा घेत या शेतकऱ्यांनी सौरऊर्जेवर चालणारे निळ्या रंगाचे स्वयंचलित प्रकाश सापळे तयार केले आहेत. अगदी घरगुती वापरातल्या वस्तूचा वापर करून बनवलेल्या सापळ्यामध्ये फुलकिडे, विविध अळ्यांचे पतंग, पांढरी माशी मोठ्या प्रमाणात अडकत आहेत.

असे आहे वैशिष्ट्य

या प्रकाश सापळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे घरातील गोडेतेलाच्या पिंपापासून तयार केले असून पूर्णतः स्वयंचलित आहे. हे सौरऊर्जेपासून चालणारे असल्याने रात्री शेतात वीज नसल्याचा फटका बसत नाही. यामध्ये फुलकिड्यासोबतच इतरही शत्रू कीटक पटकन अडकतात. एक प्रकाश सापळा एक एकरासाठी पुरेशा आहे. अत्यंत कमी खर्चात शेतकऱ्यांना तो घरीच तयार करता येऊ शकतो. यासाठी मिरची पीकतज्ज्ञ राहुल पुरमे यांनी मार्गदर्शन केले. यासाठी लागणारे साहित्य आणि तांत्रिक साहाय्य कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीने पुरवले आहे.

दरवर्षी रासायनिक औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर करूनसुद्धा फुलकिडे नियंत्रणात येत नव्हते. फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी दुसरे काय करता येईल, याच्या शोधात होतो. कृषक स्वराज शेतकरी उत्पादन कंपनीकडून पाठबळ मिळाले. हा निळा प्रकाश सापळा तयार करण्याचा प्रयोग केला. त्यात यश मिळाले. अत्यंत कमी खर्चामध्ये याचे उत्कृष्ट रिझल्ट्स आहेत. फक्त फुलकिडेच नाही तर इतर पांढरीमाशी, अळ्यांचे पतंगसुद्धा यामध्ये अडकत आहेत.

- अमोल भोंगळे, युवा शेतकरी, पंचाळा

Web Title: Blue traps were created by farmers' to prevent the infestation of flower bugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.