बोर्डा झाले देशभक्तीमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:30 PM2018-03-11T23:30:46+5:302018-03-11T23:30:46+5:30

चंद्रपूर तालुक्यातील बोर्डा येथील शहीद नंदकुमार देवाजी आत्राम व अजित माधव दास या जवानांच्या बलीदानानंतर त्यांच्या स्मृतीत बोर्डा येथे वेगळया पध्दतीचे स्मारक उभारण्यात आले आहे.

Board became patriot | बोर्डा झाले देशभक्तीमय

बोर्डा झाले देशभक्तीमय

Next
ठळक मुद्देवरूणराजाचीही श्रद्धांजली : शहीद स्मारकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील बोर्डा येथील शहीद नंदकुमार देवाजी आत्राम व अजित माधव दास या जवानांच्या बलीदानानंतर त्यांच्या स्मृतीत बोर्डा येथे वेगळया पध्दतीचे स्मारक उभारण्यात आले आहे. योग, क्रीडा आणि कलागुणांना वाव देणाºया प्रेरणादायी स्मृती उद्यानाचे रविवारी राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकार्पण केले. या अभिनव अशा स्मृती उद्यानाच्या उदघाटनानंतर त्यांनी शहीदांच्या परिवाराचा यथोचित सन्मान केला आणि त्यांच्या उत्तर आयुष्यात त्यांची काळजी घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी शहीद स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली. तेव्हा अत्यंत भावनिक वातावरण तयार झाले होते. दरम्यान, त्याच वेळी वरूणराजानेही आपली उपस्थिती दर्शवित जणू शहीदाला श्रध्दांजलीच दिली.
वर्षभरापूर्वी या ठिकाणी स्मारक उभारण्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आश्वासन दिले होते. रविवारी सायंकाळी ६ वाजता हा लोकार्पण सोहळा पार पडला. शिस्तबध्द सांध्यफेरी, सर्वत्र वाजत असलेली देशभक्तीची गीते, प्रत्येकाच्या ओठावर शहीदांचा जयजयकार आणि गावातून निघालेल्या फेरीमध्ये गावकºयांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
शहीदांचे स्मारक त्यांच्या स्मृतीसोबतच बलाच्या उपासनेचे केंद्र बनावे, ते प्रेरणादायी असावे, हे स्मारक योग अभ्यासाचे केंद्र आणि खुली व्यायाम शाळेच्या स्वरूपात असावे. यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, अशी अपेक्षा पालकमंत्री यांनी मागील वर्षी व्यक्त केली होती. आज या स्मृती उद्यानात सर्व सोयी त्याचप्रमाणे करण्यात आल्या आहेत. यावेळी व्यासपीठावर शहीद नंदकुमार यांचे वडील देवाजी आत्राम, आई ताराबाई आत्राम. शहीद अजीत दास यांच्या परिवाराचे सदस्य, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, मुकुल त्रिवेदी आदी उपस्थित होते. नंदकुमार आत्राम मार्च २०१७ मध्ये छत्तीसगढ येथे नक्षली हल्ल्यात शहीद झाले होते. शोकाकुल परिवाराची त्यांनी या घटनेनंतर भेट घेतली होती.
यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले, आम्ही घरात सुरक्षित असताना आमच्यासाठी कुणीतरी सीमेवर लढत असतो. अशा लढवय्या घरातील जेष्ठांची काळजी आम्ही घेतली पाहिजे. बोर्डा गावाने शहीदांच्या स्मृती तयार करण्यात आलेल्या या उद्यानाची उत्तम देखभाल करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली. या भूमीने अनेक शहीद दिले असून देशासाठी लढण्याचे दायित्व हा जिल्हा पूर्ण करीत आल्याचेही ते म्हणाले.
गावात देशभक्तीचे वातावरण
प्रेरणादायी स्मृती चबुतऱ्या सोबतच याठिकाणी व्हॉलीबॉल, कबड्डीचे मैदान, खुली व्यायामशाळा, योगाभ्यास करण्यासाठी वेगळी चबुतरे उभारलेली जागा, विश्रामस्थळ म्हणून तयार करण्यात आलेली सावली स्थळे आणि स्मृती उद्यानात लावण्यात आलेले वृक्ष लक्षवेधी ठरले आहे. एक वेगळे स्मृती स्थळ म्हणून या उद्यानाची जिल्हयामध्ये ओळख ठरणार आहे. या लोकार्पण सोहळयाच्या वेळी नंदकुमार यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी संपूर्ण गावातून गावकऱ्यानी शिस्तबद्ध रॅली काढली. नंदकुमार यांची मोठी प्रतिमा लावलेले वाहन अग्रभागी व त्यामागे देशभक्तीपर गीते सादर करणारी शाळकरी मुले, त्यांच्या मागे शिस्तीत चालणारे गावकरी अशी ही सांध्य फेरी लक्षवेधी होती. यामुळे गावात देशभक्तीचे वातावरण तयार झाले होते.

Web Title: Board became patriot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.