नव्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण मंडळाची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 06:36 PM2020-10-07T18:36:03+5:302020-10-07T18:38:07+5:30
Chandrapur News, Education syllabus बारावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तयारी सुरु केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अद्यापही शाळा, महाविद्यालये सुरू झाली नाही. आणखी किती दिवस ती बंद राहतील, याबाबतही अनिश्चतता आहे. दरम्यान, बारावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तयारी सुरु केली आहे. नव्या अभ्यासक्रमातील मूल्यमापन आराखडे, घटकनिहाय गुणदान, प्रात्याक्षिक, तोंडी परीक्षा, गुण देण्याची पद्धत आदींबाबत शिक्षकांना अद्यायावत करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कोरोनामुळे यावर्षी जनजीवन विस्कळीत झाले आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाला असतानाही शाळा, महाविद्यालय सुरू झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आता अधिकच संभ्रम वाढत आहे. दरम्यान, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या भाषा तसेच भाषेत्तर विषयांच्या पुनर्रचित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके, मूल्यमापन आराखडे, घटकनिहाय गुण विभागणी, प्रात्याक्षिक, तोंडी परीक्षा गुणदान योजनेच्या संदर्भात आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आखला आहे. यासाठी शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार असून शिक्षकांना ८ ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करावी लागणार आहे.
सन २०२०-२१ पासून इयत्ता १२ वीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार शिक्षकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी शिक्षकांना मंडळाच्या संकेतस्थळावर आपल्या नावाची नोंदणी करावी लागणार आहे.
-रविकांत देशपांडे
सचिव, नागपूर विभागीय मंडळ, नागपूर