फेरफार करण्यासाठी घेतली ११ हजारांची लाच, मंडळ अधिकारी व तलाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात
By परिमल डोहणे | Published: August 9, 2023 04:18 PM2023-08-09T16:18:24+5:302023-08-09T16:20:00+5:30
चिमूर येथील तलाठी कार्यालयात लाच स्वीकारताना रंगेहात अटक
चंद्रपूर : फेरफार करण्याच्या कामाकरिता ११ हजार रुपयांची लाच स्वीकारणारा तलाठी व तलाठ्यास लाच घेण्यास अपप्रेरणा देणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यास चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी चिमूर तलाठी कार्यालयात रंगेहात अटक केली. राजू विठ्ठलराव रग्गड, तलाठी कार्यालय म्हसली व मंडळ अधिकारी चिमूर सुनील महादेवराव चौधरी असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
तक्रारदार व त्यांच्या भावाच्या नावानी चिमूर तालुक्यातील मौजा अडेगाव (देशमुख) येथे गट क्र. २७३ मध्ये २.८४ हे.आर.चौ.मी. शेतजमीन आहे. तक्रारदार यांच्या आत्याचेसुद्धा त्या जमिनीवर नाव आहे. त्यांनी हक्कसोडपत्राबाबत दुय्यम निबंधक श्रेणी-१, चिमूर या कार्यालयात नोंदणी केली. त्या शेतजमिनीवर तक्रारदार व त्यांचे भाऊ यांची नावे जशीच्या तशीच ठेवून आत्याचे नाव कमी करून फेरफार करून देण्याच्या कामाकरिता तक्रारदारांनी चिमूर तालुक्यातील म्हसली तलाठी कार्यालयात अर्ज केला. मात्र, तलाठी राजू रग्गड यांनी नाव कमी करण्यासाठी १५ हजारांची लाच मागितली.
तडजोडीअंती ११ हजार रुपयांत काम करून देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सापळा रचून मंगळवारी चिमूर येथील तलाठी कार्यालयात लाच स्वीकारताना तलाठी राजू रग्गड यांना रंगेहात अटक केली. तसेच लाच स्वीकारण्यास अपप्रेरणा देणाऱ्या गोंदेडा सर्कलमधील मंडळ अधिकारी सुनील चौधरी यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक मंजूषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील, संदेश वाघमारे, रोशन चांदेकर, वैभव गाडगे, अमोल सिडाम, राकेश जांभूळकर, पुष्पा काचोळे, सतीश सिडाम आदिंनी केले.