मंडळ अधिकारी व तलाठ्याला सेवा हमी कायद्याचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:31 AM2021-03-01T04:31:23+5:302021-03-01T04:31:23+5:30
रतीराम चौधरी यांच्या वडिलाचे जुलै महिन्यात निधन झाले. त्यासाठी त्यांनी वारसान नोंदीकरिता सप्टेंबर महिन्यात चौगान येथील तलाठी कार्यालयात रीतसर ...
रतीराम चौधरी यांच्या वडिलाचे जुलै महिन्यात निधन झाले. त्यासाठी त्यांनी वारसान नोंदीकरिता सप्टेंबर महिन्यात चौगान येथील तलाठी कार्यालयात रीतसर अर्ज सादर केला. चार महिन्यानंतर तलाठी कार्यालयात जाऊन चौकशी केली असता तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. दोन्ही कर्मचाऱ्यांच्या उत्तरात एकवाक्यता नव्हती. वास्तविक, सेवा हमी कायद्यानुसार संबंधित काम हे एक महिन्याच्या आत होणे बंधनकारक आहे. मात्र संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांना सेवा हमी कायद्याचा विसर पडला आहे, असा आरोप रतीराम चौधरी यांनी केला आहे.
एका कामासाठी नागरिकांना वारंवार तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. यादरम्यान नागरिकांनी दिलेले अर्जसुद्धा गहाळ होतात. नंतर तुम्ही अर्जच दिले नाही, असे उत्तर संबंधित कर्मचारी देतात. याचाच प्रत्यय रतीराम चौधरी यांनासुद्धा आला. तुम्ही वारसान चढविण्यासाठी अर्जच दिले नाही, बघावे लागेल अशी उडवाउडवीची उत्तरे तलाठी व मंडळ अधिकारी यांनी दिले. उलट मंडळ अधिकाऱ्याने सदर प्रकरण खारीज करून टाकीन. अशी धमकी दिली, असा आरोपही चौधरी यांनी निवेदनातून केला आहे.