वैनगंगा नदीत नाव बुडाली; दोघे बेपत्ता, सहा जणांना वाचविण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 05:51 PM2020-01-14T17:51:28+5:302020-01-14T17:52:04+5:30
वैनगंगा नदीपात्राच्या कढोली-हरांबा घाटावर अंत्यविधीसाठी जाताना नाव उलटली.
चंद्रपूर : वैनगंगा नदीपात्राच्या कढोली-हरांबा घाटावर अंत्यविधीसाठी जाताना नाव उलटली. यावेळी नावेमध्ये बसलेले आठही जण नदीमध्ये बुडाले. मात्र परिसरातील नागरिक व पोलिसांच्या सहकार्याने सहा जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.परंतु, दोघेजण बेपत्ता आहेत. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी चंद्रपूर व गडचिरोली येथील पथकांना प्राचारण करण्यात आले असून त्यांचा शोध सुरु आहे. रामचंद्र हनुजी पेंदाम (४०), परशुराम वाघु आत्राम (४२) दोघेही रा. राजगोपालपुरी असे बेपत्ता व्यक्तीचे नाव आहे.
कढोली येथील एका महिलेचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्या महिलेवर कढोली-हरांबा नदीपात्रामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. अंत्यविधीसाठी गडचिरोली-चार्मोशी येथील आप्तेष्ठ नावेने येत होते. नदीघाट शंभर मिटर अंतरावर असताना नाव अचानक नदीमध्ये उलटली. यावेळी नावेमध्ये बसलेले आठहीजण नदीत बुडाले. यावेळी नदीघाटावर उपस्थित नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. तसेच बुडालेल्या नातेवाईकांना काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
दरम्यान सावलीच्या तहसीलदार, सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरिक्षक मस्के, पोलीस उपनिरिक्षक उंदिरवाडे यांच्या नेतृत्वात सर्व पोलिसांची चमू दाखल झाली. पोलिसांनी उपस्थिताच्या मदतीने अमलजीत सुरेश कन्नाके (३०), देवराव मोहन कन्नाके (४०), केशव मोहन कन्नाके (४५), गंगाधर सोमू वेलादी (५३), संदीप देवराम कन्नाके (३५), कमलाबाई देवराव कन्नाके या सहा जणांना सुखरुप बाहेर काढले. मात्र रामचंद्र हनुजी पेंदाम व परशुराम आत्राम यांचा शोध लागला नाही. त्यामुळे चंद्रपूर व गडचिरोली येथील पानबुड्याची चमू बोलविण्यात आली. त्यांच्याकडून शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र वृत्त लिहीपर्यंत त्या दोघांचा शोध लागला नाही.