‘त्या’ दोघांचाही मृतदेह आढळला; वैनगंगा नदीत नाव उलटल्याची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 06:26 PM2020-01-15T18:26:20+5:302020-01-15T18:27:16+5:30
स्थानिक मच्छिमारांना त्या दोघांचा मृतदेह नदीघाटावरुन शंभर मीटर अंतरावर आढळून आला.
चंद्रपूर: वैनगंगा नदीपात्राच्या कढोली-हरांबा घाटावर अंत्यविधीसाठी जाताना नाव उलटल्याने दोघेजण बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. त्या दोघांचा पानबुड्याकडून शोध सुरु होता. बुधवारी दुपारच्या सुमारास स्थानिक मच्छिमारांना त्या दोघांचा मृतदेह नदीघाटावरुन शंभर मीटर अंतरावर आढळून आला. रामचंद्र हनुजी पेंदाम (४०), परशुराम वाघु आत्राम (४२) दोघेही रा. राजगोपालपुरी ता. चामोर्शी असे मृत युवकांचे नाव आहे.
कढोली येथील एका महिलेचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्या महिलेवर कढोली-हरांबा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. अंत्यविधीसाठी गडचिरोली-चामोर्शी येथील आप्तेष्ठ नावेने येत होते. नदीघाट १०० मीटर अंतरावर असताना नाव अचानक डोहात उलटली. यावेळी नावेमध्ये बसलेले आठजण नदीत बुडाले. पोलीस व नागरिकांच्या मदतीने अमलजित सुरेश कन्नाके (३०), देवराव मोहन कन्नाके (४०), केशव मोहन कन्नाके (४५), गंगाधर सोमू वेलादी (५३), संदीप देवराम कन्नाके (३५), कमला देवराव कन्नाके या सहा जणांना खोल डोहातून सुखरूप बाहेर काढले.
मात्र रामचंद्र हनुजी पेंदाम व परशुराम आत्राम यांचा पत्ता लागला नाही. त्यामुळे सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी चंद्रपूर व गडचिरोली येथील पानबुड्यांची चमू बोलावली. या चमूच्या सहाय्याने रात्रीपर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र त्या दोघांचा पत्ता लागला नाही. बुधवारी पोलीस प्रशासनाने स्थानिक मच्छिमाराच्या सहाय्याने शोधमोहीम राबवली. दरम्यान दुपारच्या सुमारास नदीघाटापासून शंभर मीटर अंतरावर त्या दोघांचाही मृतदेह आढळून आला. यावेळी ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्यासह सावली पोलिसांची चमू उपस्थित होती.
नावेमधून उडी घेतल्याने घडली घटना
त्या नावेला छोटे छिद्र होते. त्यामुळे नावेमध्ये पाणी जमा होत होते. काही अंतर पार केल्यानंतर नावेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. त्यामुळे दोघांनी नावेमधून उडी घेतली. परिणामी नावेचे संतुलन बिघडले. त्यामुळे नाव पलटी झाली.