शाळेसमोरच ठेवला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:08 AM2018-10-21T00:08:12+5:302018-10-21T00:08:48+5:30
येथील फेअरीलँण्ड स्कूलमधील व आदिवासी वसतिगृहात निवासी असलेल्या एका आदिवासी विद्यार्थिनीचा आजाराने नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचा मृत्यू वसतिगृहाचे अधीक्षक व शाळेचे संचालक यांच्या निष्काळजीपणाने झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : येथील फेअरीलँण्ड स्कूलमधील व आदिवासी वसतिगृहात निवासी असलेल्या एका आदिवासी विद्यार्थिनीचा आजाराने नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचा मृत्यू वसतिगृहाचे अधीक्षक व शाळेचे संचालक यांच्या निष्काळजीपणाने झाला. त्यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करा, या मागणीसाठी विद्यार्थिनीचे पालक व आदिवासी संघटनेचे नेते रमेश मेश्राम यांच्या नेतृत्वात शनिवारी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर विद्यार्थिनीचा मृतदेह ठेवून निदर्शने करण्यात आली.
या घटनेने याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. तब्बल सहा तासानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने व चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपाासणीकरिता पाठविण्यात आला.
आचल सिताराम कुळमेथे (१४) रा. मांगली रै. असे मृतक विद्यार्थीनीचे नाव असून ती गेल्या तीन वर्षांपासून वसतिगृहात राहून फेअरीलँण्ड स्कूल येथे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेत होती. ती आठव्या वर्गाची विद्यार्थिनी होती. गेल्या पाच दिवसांपासून तिची प्रकृती बरी नसल्याने अधीक्षक व शाळेच्या संचालकांनी तिच्यावर स्थानिक खासगी दवाखान्यात उपचार केला. तिची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर तिच्या पालकांना सूचना देण्यात आली. त्यानंतर आचलला नागपूर येथील मेयोमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी आचलचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला येथील अधीक्षक व शाळेचे संचालकच जबाबदार आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप मुलीचे पालक सिताराम कुळमेथे व त्यांचे नातेवाईक तसेच आदिवासी संघटनेचे रमेश मेश्राम यांनी केला व आचलचा मृतदेह शाळेच्या समोर ठेवून आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत आरोपींना अटक करणार नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पावित्रा घेतल्याने हे प्रकरण आणखीच चिघळले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका दंडाधिकारी महेश शितोळे, उपविभागीय पोलीस अधीकारी प्रताप पवार, निवासी नायब तहसीलदार मधुकर काळे यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर जमाव शांत झाला.
आचलचा मृत्यू आजारामुळेच -युवराज धानोरकर
फेअरीलँण्डचे स्कूलचे अध्यक्ष अॅड. युवराज धानोरकर यांना विचारणा केली असता माझ्या शाळेतील वसतिगृहात गडचिरोली, भामरागड, चिमूर व चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील ३६० विद्यार्थी असून मृतक आचल ही तालुक्यातील मांगली रै. येथील होती. तिची प्रकृती बरी नसल्याचे आमच्या लक्षात आले होते. तिच्यावर भद्रावती येथील खासगी दवाखान्यात उपचार केला. परंतु तिची प्रकृती खालावत असल्याचे लक्षात आल्याने तिच्या पालकास याबाबत सूचना करून तिच्यावर चांगल्या दवाखान्यात उपचार करा, असा सल्ला देवून तिला त्यांच्या स्वाधीन केले. आचलवर केलेल्या उपचाराचे पेपर्स आमच्याकडे आहे. आम्ही उपचारासाठी कोणतीही हयगय केली नसल्याचे धानोरकर यांनी सांगितले.