मारोडातील बोगस बंधारे स्थायी समितीत गाजले
By Admin | Published: July 18, 2015 12:51 AM2015-07-18T00:51:49+5:302015-07-18T00:51:49+5:30
मूल तालुक्यातील मारोडा येथील बंधाऱ्यान्ंचे बांधकाम शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत चांगलेच गाजले.
अध्यक्षांनी चौकशी नाकारली : विविध मुद्यांवर बैठक गाजली
चंद्रपूर : मूल तालुक्यातील मारोडा येथील बंधाऱ्यान्ंचे बांधकाम शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत चांगलेच गाजले. या बंधाऱ्यांच्या चौकशीवरून अध्यक्ष आणि सदस्यांमध्ये खडाजंगी उडाली. मात्र अध्यक्षांनी बंधाऱ्यांच्या चौकशीची मागणी फेटाळून लावली.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा बंधारे, कृषी अवजारे या मुद्यांवरून गाजणार अशी शक्यता आधीपासूनच सदस्यांमध्ये वर्र्तविली जात होती. या अपेक्षेनुसार ही बैठक चांगलीच गाजली. मारोडा येथील सिंमेंट फ्लग बंधाऱ्यांच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांकडून चौकशीचीही मागणी झाली होती. राजकीय मंडळींच्या निकटस्थ व्यक्तीला या कामाचे कंत्राट दिल्याचाही आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला. जिल्हा परिषद सदस्य सतीश वारजूकर आणि विनोद अहिरकर यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी केली. मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांनी या विषयावर कसलेही उत्तर न देता चर्चा टाळण्याचा प्रयत्न केला. हा विषय आपल्या क्षेत्रातील असल्याने बाहेरच्या क्षेत्रातील सदस्यांनी यावर बोलू नये, असे त्यांनी सुनावले. यावर, आपण सभागृहाचे सदस्य असल्याने या विषयावर प्रश्न विचारण्याचा हक्क कुणीही नाकारू शकत नाही, अशी भूमिका या सदस्यांनी घेतली. या गदारोळात अध्यक्षांनी बंधाऱ्याच्या बांधकामाच्या चौकशीचीे मागणी फेटाळून लावली.
पाणी पुरवठ्याचाही मुद्दा या बैठकीत गाजला. सदस्य नागराज गेडाम यांनी ग्रामीण पाणी पुरवठ्यासंदर्भात मुद्द उपस्थित केला. मात्र जलव्यवस्थापन समितीच्या तांत्रिक मुद्यावरून या प्रश्नावर बरीच ओढाताण झाली.
कार्यकारी अभियंत्यांनाही या संदर्भात विचारणा केली असता त्यानीही समाधानकारक उत्तर दिले नाही. शेतीच्य हंगामातही साहित्याचे वाटप न झाल्याबद्दल सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला.
चिमूर नगर परिषदेची स्थापना नव्याने झाली असून त्यात १२ गावांचा समावेश झाला आहे. मात्र ही गावे पालिका क्षेत्रात आले असली तरी येथील शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित न ठेवता या शेतकऱ्यांना या वर्षी समाजकल्याण आणि कृषी विभागाच्या योजनांचा लाभ देण्याची मागणी सदस्य सतीश वारजुकर यांनी केली. त्यावर या वर्षीपुरता या लाभार्थ्यांना मदत पुरविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)