ग्रामीण भागातील रुग्णांवर बोगस डॉक्टरांची मलमपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 01:04 PM2022-01-06T13:04:47+5:302022-01-06T13:15:47+5:30
Bogus Doctor : वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही परवानगी अथवा पदवी नसताना थातूरमातूर केलेल्या वैद्यकीय सेवेच्या भरवशावर तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.
दीपक साबने
चंद्रपूर : जिवती तालुक्यात जिवती व पाटण येथे दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात १२ तर, पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ अशा एकूण १८ उपकेंद्रांचा समावेश आहे. ग्रामीण जनतेचे आरोग्य नीट राहावे. त्यांना आरोग्याची योग्य सेवा मिळावी, यासाठी आरोग्य सेवेची निर्मिती केली आहे. परंतु अपुऱ्या सोई-सुविधा व कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे ग्रामीण जनतेला जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घ्यावी लागत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी ही संधी पाहून बोगस डॉक्टरांनी आपले बस्तान ग्रामीण भागात पसरवून गरीब जनतेची लूट व त्यांच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे.
शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे उपचारासाठी रुग्ण गेले असता त्या सर्वांना एकसारख्याच गोळ्या देतात. काही उपकेंद्रात कर्मचारीच वेळेवर उपस्थित राहत नाहीत तर, काही ठिकाणी उपचार बरोबर करत नाहीत, अशा नानाविध समस्येमुळे ग्रामीण भागातील गरीब जनता नाईलाजाने बोगस डॉक्टरांकडून उपचार करून घेतात. काहीजण उपचारावर समाधान व्यक्त करतात तर, काही तक्रार. सध्या बदलत्या वातावरणामुळे लोक आजारी पडल्यामुळे खासगी दवाखाने गच्च भरलेले दिसताहेत.
वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही परवानगी अथवा पदवी नसताना थातूरमातूर केलेल्या वैद्यकीय सेवेच्या भरवशावर तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष तर, होत नाही ना?, असा सवाल उपस्थित होत आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे सर्व सोयी सुविधा व कर्मचारी उपलब्ध करून द्यावे व स्वंयघोषित बोगस डॉक्टर यांच्याकडून जीवाशी होणाऱ्या खेळाला व जनतेच्या लुबाडणुकीला ब्रेक लावावा, अशी जनतेकडून मागणी होत आहे.