बोगस डॉक्टरवर पोलिसांत गुन्हा दाखल
By admin | Published: July 27, 2016 01:09 AM2016-07-27T01:09:56+5:302016-07-27T01:09:56+5:30
राजुरा तालुक्यातील लक्कडकोट आणि कोष्टाळा येथील दोन महिलांचा बोगस डॉक्टरने दिलेल्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाला होता.
राजुरा : राजुरा तालुक्यातील लक्कडकोट आणि कोष्टाळा येथील दोन महिलांचा बोगस डॉक्टरने दिलेल्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाला होता. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित करून आरोग्य विभागाचे लक्ष वेधले. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून त्या बोगस डॉक्टरवर मंगळवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
डॉ. भुपाल असे बोगस डॉक्टरचे नाव असून तो सध्या फरार आहे. राजुरा तालुक्यातील कोष्टाळा, लक्कडकोट, गोट्टा यासह कोरपना, जिवती तालुक्यात अनेक बोगस डॉक्टर असून विना परवानगीने ग्रामीण जनतेच्या जीवाशी खेळत आहेत. डॉ. भुपाल नामक बोगस डॉक्टरच्य इंजेक्शनमुळे लक्कडकोट आणि कोष्टाळा येथील दोन महिलांचा काही दिवसांपुर्वी मृत्यू झाला होता. याबाबत सर्वप्रथम ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी गजेंद्र अहीरकर यांनी लोकमतच्या वृत्ताची दखल घेत बोगस डॉक्टरच्या विरुद्ध पोलिसात तक्रार केली असता, डॉ. भुपालवर ३०४ अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याच्या क्लिनीकचा पोलिसांसमक्ष पंचनामा केला असता, दोन लाखांचा औषधसाठा सापडला. त्यातील काही औषधे एक्सपायरी झालेली होती. (शहर प्रतिनिधी)