राजुरा तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
By admin | Published: November 17, 2014 10:51 PM2014-11-17T22:51:44+5:302014-11-17T22:51:44+5:30
राजुरा तालुक्यातील अनेक गावांत इंडियन मेडीकल असोसिएशनचे अधिकृत प्रमाणपत्र नसलेल्या डॉक्टरांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या डॉक्टरांच्या उपचारामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे
राजुरा : राजुरा तालुक्यातील अनेक गावांत इंडियन मेडीकल असोसिएशनचे अधिकृत प्रमाणपत्र नसलेल्या डॉक्टरांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या डॉक्टरांच्या उपचारामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. हे बोगस डॉक्टर रुग्णांचा जीव धोक्यात आल्यानंतर आपल्या मर्जीप्रमाणे डॉक्टरांचे नाव सुचवून त्यांच्याकडे पाठवितात. त्यातून संबंधित रुग्णांची लूट केली जात आहे.
तालुक्यातील शासकीय आरोग्य सेवा कोलमडल्यामुळे रुग्णांना नाईलाजाने बोगस डॉक्टराकडून उपचार करून घ्यावे लागत आहे. रुग्णांची कोणतीही तपासणी न करता रुग्णाला अगोदर इंजेक्शन लावले जाते. त्यानंतर गोळ्या दिल्या जातात. यामुळे अनेकदा प्रकृती सुधारण्याऐवजी ती खालावतच जाण्याचा प्रकारही अनेकदा घडतो. या माध्यमातून ग्रामीण अशिक्षित जनतेला लुबाडण्याचा गोरखधंदा सुरू आहे.
ग्रामीण भागात शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तसेच उपकेंद्रात परिचारिका उपचार करतात. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून गावे लांब अंतरावर असल्यामुळे जाणे-येणे अवघड असते. याच संधीचा फायदा घेत बोगस डॉक्टरांचा व्यवसाय बिनधास्त सुरू आहे. त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. कारवाईच होत नसल्याने त्यांना पोलीस विभाग व आरोग्य विभागाची भीती नाही. फक्त घरोघरी जावून उपचार करून खिसे गरम करणे हा एकमेव व्यवसाय हे डॉक्टर करीत आहेत. बोगस डॉक्टरांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रावरील ताण कमी होतो. रुग्ण कमी येतात. परिणामी वैद्यकीय अधिकाऱ्याला आराम मिळतो. त्यामुळे बोगस डॉक्टरांची तक्रार केली जात नाही. बहुतेक गावात शासनाचे आरोग्य कर्मचारी कार्यरत आहे. त्यांना रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांची नावे माहित आहे. मात्र कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही.
सध्या मलेरिया, टायफाईड, डेंग्यूची साथ सर्वत्र सुरू आहे. त्यावर तज्ज्ञ डॉक्टराकडून उपचार करणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण गेल्यास आरोग्य कर्मचाऱ्यावर ताण येतो. भरती केल्यास रुग्णाची पुर्णवेळ देखरेख करावी लागते. त्यामुळे कर्मचारी संबंधित रुग्णाला आरोग्य केंद्रातून कसे पळविता येईल, यासाठी प्रयत्न करतात. प्रसंगी रुग्णाला आवश्यक उपचारही दिले जात नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. अपूर्ण उपचारामुळे रुग्ण पुन्हा आजारी पडतो. मग त्याचा प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपचारावरील विश्वास उडतो. यातून बोगस डॉक्टरांचे चांगलेच फावत आहे.
बोगस डॉक्टरांना मेडीकल स्टोअर्समधून औषधी दिली जात नाही. परंतु आडमार्गाने ही औषधी उपलब्ध करून दिली जाते. बोगस डॉक्टरांंना सलाईन लावण्याचा अधिकार नसताना सलाईन लावली जाते. त्याचे १००-१२० रुपये घेतले जातात. गोरगरीबांना याचा आर्थिक फटका बसतो. पुर्ण रक्कम दिल्याशिवाय रुग्णास जावू दिले जात नाही. त्यामुळे उसणवारी करून डॉक्टरांचे बिल द्यावे लागते. त्यानंतर रुग्णाची सुटका केली जाते. (तालुका प्रतिनिधी)