बोगस पट्टेधारकांनी केली वनसंपदा नष्ट

By admin | Published: June 10, 2016 01:06 AM2016-06-10T01:06:50+5:302016-06-10T01:06:50+5:30

तालुक्यातील देवाडा खुर्द येथील बोगस पट्टेधारकांनी शासकीय जमिनीवर वडिलोपार्जित कुठलेही अतिक्रमण व वहिवाट नसताना ...

The bogus leaseholders destroyed the forest resources | बोगस पट्टेधारकांनी केली वनसंपदा नष्ट

बोगस पट्टेधारकांनी केली वनसंपदा नष्ट

Next

राजकीय दबावाखाली कारवाई शून्य : भाजपा कार्यकर्त्यांनीच मिळविले बोगस पट्टे
पोंभुर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द येथील बोगस पट्टेधारकांनी शासकीय जमिनीवर वडिलोपार्जित कुठलेही अतिक्रमण व वहिवाट नसताना अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस पट्टे मिळविले आणि त्या ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे बांबु व इतर झाडे नष्ट करून शासनाच्या लाखो रुपयाची वनसंपदा नष्ट केली. असे असतानासुद्धा महसूल व वनविभाग मूग गिळून गप्प आहेत. या विभागाचा बोगस पट्टेधारकांना कृपा आर्शिवाद असल्याची खमंग चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.
संबंधित व्यक्तीवर कारवाई न झाल्यास आणि त्यांची नावे सातबारा रेकॉर्डवरून कमी न केल्यास या गावकऱ्यांतर्फे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील सत्ताधारी पक्षाशी निगडीत असलेल्या काही राजकीय व्यक्तींनी शासकीय मुळ रेकॉर्डवर कुठल्याही नावाची नोंदणी नसताना आणि त्यांची वडिलोपार्जित वहीवाट नसताना सुद्धा केवळ राजकीय बळाचा वापर करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस व बनावट कागदपत्राच्या आधारे बोगस पट्टे तयार केले आणि गावकऱ्यांच्या वहिवाटीच्या व चराईच्या जागेवर अतिक्रमण करून त्याठिकाणी ट्रॅक्टरद्वारे धान पिकाचे बांध काढले. त्यात असलेले बांबु व इतर झाडे उद्ध्वस्त करून शासनाच्या लाखो रुपयाच्या वनसंपदेला चुना लावला आहे. एवढे होवूनसुद्धा महसूल व वनविभाग मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई न करताना मूग गिळून गप्प बसल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संबंधित जागेच्या मुळ सातबारा रेकॉर्डवर निस्तार व दहा गावांतील नागरिकांच्या जनावरांसाठी चराईसाठी दर्ज असताना आणि बोगस पट्टेधारकांच्या नावाचा त्याठिकाणी अतिक्रमण असल्याची कुठलीही नोंद नसताना त्यांना पट्टे कोणत्या आधारावर देण्यात आले, याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला असुन एकीकडे ४० ते ५० वर्षांपासून वडिलोपार्जित जागेवर अतिक्रमण करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या जबरान जोत शेतकऱ्याला एका एकरचा पट्टा मिळाला नाही तर या बोगस पट्टेधारकांना मात्र केवळ एक ते दोन महिन्यातच शासनाकडून यापूर्वीच त्यांच्या कुटुंबात पट्टा मिळाला असतानासुद्धा त्याच कुटुबात पुन्हा पट्टा देण्यात आला आहे.
या संदर्भात गावकऱ्यांनी तक्रार केल्याने यातील तीन बोगस पट्टेधारकाचे पट्टे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. तर त्यांची सातबारा रेकॉर्डवरून अजुनपर्यंत नावे कमी केले नसल्याचे समजते. आणखी पाच बोगस पट्टेधारकांचे प्रकरण गोंडपिपरी येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पुनर्विलोकन करण्यासाठी ठेवण्यात आले असुन यातील मुख्य सूत्रधार वनसमिती अध्यक्ष सुनिल गांगरेड्डीवार यांचा सुद्धा पट्टा अजुनपर्यंत रद्द झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. या संपुर्ण बोगस पट्टेधारकांचे बोगस पट्टे रद्द करून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणातील मुख्य सुत्रधार यांचेवर व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि गावकऱ्यांच्या चराई व गुरेढोरे ठेवण्याची जागा मोकळी करून देण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)

तर तीव्र आंदोलन करणार
कोणत्याही शासकीय योजनांमध्ये राजकीय लाभ उचलण्याची जुनीच परंपरा आहे. यामुळे खरे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. देवाडा खुर्द येथे घडलेला प्रकारही राजकीय दबावातूनच घडला आहे. भष्ट्राचार झाल्याचे स्पष्ट असतानाही संबंधितांवर कारवाई होत नाही. यावरून हा सर्व प्रकार संगणमताने झाला असल्याचे दिसून येते. याप्रकरणी कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारासरपंच विलास मोगरकर यांनी दिला आहे.

Web Title: The bogus leaseholders destroyed the forest resources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.