गोंडपिंपरी तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
By admin | Published: February 24, 2016 12:55 AM2016-02-24T00:55:39+5:302016-02-24T00:55:39+5:30
तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून बोगस डॉक्टरांनी ठाण मांडून क्लिनिक थाटले आहे.
गोंडपिंपरी : तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून बोगस डॉक्टरांनी ठाण मांडून क्लिनिक थाटले आहे. हा गोरखधंदा सुरू असताना प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळण्याच प्रकार सुरू आहे.
तालुक्यातील बोगस डॉक्टरांच्या विरोधात अनेकदा वृत्तपत्रात बातम्या आल्या. मात्र प्रशासनाने तालुक्यात सुरू असलेल्या अनाधिकृत उपचार केंद्रावर कुठलीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही. प्रशासनाच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीेण रुग्णालये अस्तित्वात आहेत. मात्र प्रशासनातील आरोग्य विभागात काम करणारी मंडळी गावखेड्यामध्ये आरोग्य सेवा पोहचविण्यात कुचकामी ठरत असल्याने तालुक्यातील अनेक अनेक गावांमध्ये अर्धवरज्ञानी बोगस डॉक्टरांनी ठाण मांडून नागरिकांच्या जिवीताशी खेळण्याचा गंभीर प्रकार सुरू केल्याचे दिसून येते.
यात बोगस डॉक्टर प्रसूती, रुग्ण, किरकोळ जखमींवर शस्त्रक्रिया, बड्या आजारांवरही उपचार करत असून गर्भपात व अन्य आजारांवरही उपचार करत असल्याची माहिती आहे. या संदर्भात गेल्या दिवसांपुर्वी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करुन या बोगस डॉक्टरांच्या अॅलोपॅथीक उपचार तर औषधालयातून यांच्याच मार्फत केलेल्या लिखाणातून औषध दिल्या जात असल्याचा प्रकार जनतेपुढे आणला होता. मात्र प्रशासकीय स्तरावरुन अशा बोगस डॉक्टरांविरुद्ध अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही.
गत काही वर्षांपूर्वी एका बोगस डॉक्टरने तालुक्यातील एका नागरिकाच्या पायावर शस्त्रक्रिया केली. मात्र पाय दुरूस्त होण्याऐवजी त्याला आजीवन अपंगत्व आले. असा प्रकार कित्येक रूग्णांसोबत घडत असून नागरिकांच्या जीवताशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)