साहित्य महोत्सवात ग्रंथ विक्रेत्यांचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 06:00 AM2020-02-27T06:00:00+5:302020-02-27T06:00:35+5:30
मराठी साहित्य संमेलनाच्या मांदियाळीत विदर्भ साहित्य संघाद्वारे आयोजित संमेलनाला साहित्य चळवळीत महत्त्व आहे. विसासंघाच्या साहित्य संमेलनांनी विविध साहित्य प्रवाहांना सामावून घेण्याचा उमेदपणा दाखविल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे स्थानिक साहित्य संस्थांच्या सहयोगातून साहित्य संमेलने आयोजित करताना विदर्भ साहित्य संघासारखी प्रतिष्ठित संस्था सहभागी झाल्यास सर्वांच्याच अपेक्षा उंचावतात.
राजेश मडावी।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चांदा क्लब चंद्रपूर व विदर्भ साहित्य संघ नागपूरतर्फे चांदा क्लब ग्राऊंडवरील साहित्य संस्कृती महोत्सवादरम्यान रसिकांनी फारशी गर्दी केली नाही. त्यामुळे केवळ अडीच लाखांचीच ग्रंथविक्री झाली. पुणे, सोलापूर, औरंगाबाद सारख्या लांब अंतरावरील ग्रंथ विक्रेत्यांनी स्टॉल्स लावले होते.
मराठी साहित्य संमेलनाच्या मांदियाळीत विदर्भ साहित्य संघाद्वारे आयोजित संमेलनाला साहित्य चळवळीत महत्त्व आहे. विसासंघाच्या साहित्य संमेलनांनी विविध साहित्य प्रवाहांना सामावून घेण्याचा उमेदपणा दाखविल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे स्थानिक साहित्य संस्थांच्या सहयोगातून साहित्य संमेलने आयोजित करताना विदर्भ साहित्य संघासारखी प्रतिष्ठित संस्था सहभागी झाल्यास सर्वांच्याच अपेक्षा उंचावतात. चंद्रपुरातील संमेलनाला तर थेट सांस्कृतिक महोत्सवाची जोड दिली होती. त्यामुळे गर्दी जमेल अशी ग्रंथ विक्रेत्यांना आशा होती. चार विक्रेत्यांना तर प्रवास खर्चही निघाला नाही. पुस्तकांच्या दुकानातून कापडी कोट विकल्याने बरे झाले, अशी माहिती एकाने दिली. ग्रंथदालनातील एका दुकानातून काहींनी चक्क हळदीची पाकिटे विकत घेतल्याचे पाहून आश्चर्य वाटल्याचे श्रीकांत साव यांनी सांगितले.
वैचारिक ग्रंथांना सर्वाधिक पसंती
वाचकांनी ललितऐवजी वैचारिक ग्रंथांची सर्वाधिक खरेदी केली. कथा, कविता, कांदबरी व आत्मकथनाची पुस्तके विकली नाहीत. वर्तमानातील अस्वस्थ प्रश्नांना भेडणारे विषय वाचकांना आकर्षित करत असल्याचे निरीक्षण पुण्याच्या राजहंस प्रकाशनाचे शरद अष्टेकर यांनी नोंदविले.
आयोजकांचे चुकले कुठे?
सोलापुरातील विजय बुक सर्व्हिसेसचे राजन देडे म्हणाले, संमेलनाची तयारी डौलदार होती. मात्र, शासकीय सरस महोत्सादरम्यान लावलेले स्टॉल्स जैसे थे ठेवून ग्रंथ विक्रेत्यांना वेगळी जागा दिली. सरसच्या जागेवर चहा, नाश्त्याची दुकाने लागली. त्यामुळे बरेच रसिक कार्यक्रम पाहून घेऊन थेट सरस स्टॉलकडेच जायचे. संमेलन, ग्रंथदालन व नाश्ता अशा घटकांना एकत्र ठेवणे शक्य होते. औरंगाबादचे बी. आर. काळे यांनी रसिकांची गर्दी न होण्यामागे संमेलनाचा प्रचार व प्रसार कमी पडला, अशी शंका व्यक्त केली.
फिरकले नाहीत विद्यार्थी
पुसद येथील विद्याधनचे अशोक गोरे यांनी विद्यार्थ्यांसाठी १२ प्रकारचे नकाशे तयार केले. विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचा कल लक्षात घेऊन निर्मिलेल्या ज्ञानवर्धक शैक्षणिक साहित्याने पालक व शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले. वाचन लेखनाचे उत्तम संस्कार बालमनावर रूजविण्यासाठी साहित्य संमेलन उत्सव उत्सव असतो. पण संमेलनात पहिला दिवस सोडल्यास मुले फिरकली नाही, अशी खंत गोरे यांनी व्यक्त केली.