मेडिकल ऑक्सिजनची मागणी घटल्याने उद्योगांना बूस्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 05:00 AM2021-06-26T05:00:00+5:302021-06-26T05:00:32+5:30
कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्ह्यासाठी दरदिवशी २० मेट्रिक टनप्रमाणे दोन दिवसाआड ४० मेट्रिक टन ऑक्सिजन मंजूर होता. मात्र, सुरुवातीला पुरेशा क्षमतेचे वायू टँकर न मिळाल्याने केवळ २५ मेट्रिक टन ऑक्सिजनची उचल करणे सुरू होते. दरम्यान, कोरोना उद्रेकामुळे गंभीर रुग्णांची संख्या वाढल्याने अतिरिक्त ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले.
राजेश मडावी
चंद्रपूर : कोरोना संसर्गाचा उद्रेक उच्चबिंंदूवर असताना सर्वत्र ‘ऑक्सिजन’ हाच शब्द ऐकायला मिळत होता. गंभीर रुग्णांना ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेची प्रचंड दमछाक झाली होती. उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा मेडिकलसाठी वळविल्याने बरेच उद्योग बंद पडले. मात्र, रुग्णसंख्या कमी झाल्याने मेडिकल ऑक्सिजन मागणीत घट झाली. परिणामी, तीन महिन्यांपासून केवळ धुगधुगी उरलेल्या उद्योगांना आता बुस्टर मिळाला आहे. मात्र, उद्योगचक्र गतिमान व्हायला आणखी काही दिवस लागतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्ह्यासाठी दरदिवशी २० मेट्रिक टनप्रमाणे दोन दिवसाआड ४० मेट्रिक टन ऑक्सिजन मंजूर होता. मात्र, सुरुवातीला पुरेशा क्षमतेचे वायू टँकर न मिळाल्याने केवळ २५ मेट्रिक टन ऑक्सिजनची उचल करणे सुरू होते. दरम्यान, कोरोना उद्रेकामुळे गंभीर रुग्णांची संख्या वाढल्याने अतिरिक्त ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले. ऑक्सिजन तूट भरून निघत असतानाच मार्च २०२१ च्या पहिल्या आठवड्यापासून शासकीय व खासगी कोविड रुग्णालये फुल्ल झाली. वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने काही रुग्णांचे बळी गेले, याच काळात नैसर्गिक ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे कामही सुरू झाले. आता रुग्णसंख्या कमी असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन काही प्लांटची कामे अजूनही सुरू आहेत.
सद्यस्थितीत दोन टँकरच पुरेसे
चंद्रपूर जिल्ह्यासाठी दोन टँकरद्वारे लिक्विड ऑक्सिजन वाहतूक करता येऊ शकते. एकाची १० मेट्रीक टन तर दुसऱ्या टँकरची क्षमता १५ मेट्रीक टन आहे. एवढा ऑक्सिजन सध्या तरी पुरेसा असल्याची माहिती सूत्राने दिली. जिल्ह्याचा प्रतिदिवस मंजूर २० मेट्रीक टन याप्रमाणे दोन दिवसात ४० मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा होऊ शकतो. परंतु, आता मेडिकल ऑक्सिजनची मागणी कमी झाली. हा ऑक्सिजन उद्योगांकडे वळविण्यात आला. मागणी नसल्याने दोन टँकर पुरेसे असल्याची माहिती आहे.
मार्चमध्ये असा होता ऑक्सिजन पुरवठा
n कोरोना रूग्णवाढ झपाट्याने सुरू असताना दर दोन दिवसाआड २५ मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन भिलाईतून चंद्रपुरात आणला जात होता. त्यातील १० मेट्रीक टन आदित्य एअर प्रॉडक्टला आणि १५ मेट्रीक टन रूक्मिणी मेटॅलिकला मिळायचा. वाहतुकीसाठी तब्बल ३६ तास खर्ची व्हायचे. आज ही धावपळ थांबली आहे.
गडचिरोली व वणी येथील पुरवठा घटला
चंद्रपूर एमआयडीसीमधील प्लांटमधून गडचिरोलीत ५०० आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे ६० सिंलिडर पाठविले जात होते. एक वाहन भरण्यापूर्वीच दुसरे वाहन वेटींगवर असायचे. आताची स्थिती पूर्णत: बदलली आहे. ऑक्सिजन पुरवठा कमालीचा खाली आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात आता १२ ते १५ मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा होत आहे. कोविड उद्रेकाच्या काळात स्थिती वेगळी होती. रूग्णसंख्या कमी झाली. मात्र संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने ऑक्सिजन वितरणावर पूर्ण नियंत्रण ठेवले. निर्बंध शिथिल झाल्याने आता उद्योगांसाठीही ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.
- नितीन मोहिते,
सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर
मेडिकल ऑक्सिजनची मागणी घटली हे खरे आहे. उद्योगांच्या मागणीनुसार पुरवठा सुरू आहे. मात्र अजुनही उद्योग चक्राला गती मिळाली नाही. त्यामुळे मागणीत उठाव नाही. उद्योगांची स्थिती बदलायला पुन्हा काही दिवस लागतील. त्यामुळे वाट पाहणे सुरू आहे.
- इशान गोयल,
संचालक, आदित्य एअर प्रॉडक्ट,
चंद्रपूर
निर्बंधामुळे उद्योगांचे प्रचंड नुकसान झाले. उद्योगांना आता पुरेसा ऑक्सिजन मिळू लागला. उत्पादनही सुरू झाले. परंतु कोरोनाची स्थिती केव्हाही बदलू शकते. नुकसान भरून निघण्यासाठी शासनाकडून मदतीची गरज आहे.
-मधुसूदन रूंगठा,
अध्यक्ष, एमआयडीसी, चंद्रपूर