घोडाझरीवर मद्यपींची वक्रदृष्टी
By admin | Published: September 19, 2015 01:32 AM2015-09-19T01:32:28+5:302015-09-19T01:32:28+5:30
रमनीय आणि निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून अख्ख्या विदर्भात प्रसिद्ध पावलेल्या आणि पावसाळ्याच्या ...
नागभीड : रमनीय आणि निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून अख्ख्या विदर्भात प्रसिद्ध पावलेल्या आणि पावसाळ्याच्या दिवसात रोज हजारो पर्यटकांची गर्दी खेचणाऱ्या घोडाझरी या पर्यटन स्थळावर आता दारूबाजांची वक्रदृष्टी पडली आहे. पर्यटनाऐवजी दारूचा मनमुराद आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येणाऱ्या या आंबटशौकीन पर्यटकांचा महिला आणि इतर पर्यटकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.
तिन्ही बाजूला नैसर्गिक टेकड्या आणि एका बाजूला मानवनिर्मित भिंत घालून तयार करण्यात आलेला घोडाझरी तलाव पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील रोज होत असलेली गर्दी लक्षात घेतली तर या आकर्षणाची प्रचिती येते. केवळ पर्यटनच नाही तर या भागातील सिंचनाची गरज लक्षात घेऊन इंग्रजांनी या तलावाची निर्मिती केली. ज्या उद्देशाने या तलावाची निर्मिती केली, ते दोन्ही उद्देश १०८ वर्षानंतरही साध्य होत आहेत. या तलावाच्या माध्यमातून नागभीड आणि सिंदेवाही तालुक्यातील १२ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.
चहुबाजूने घनदाट जंगल आणि मध्ये तलाव यामुळे या तलावाचे नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलून दिसते. पावसाळ्याच्या दिवसात या सौंदर्याला अधिकच बहार येते. तलाव ‘ओव्हर फ्लो’ झाला की, हे नैसर्गिक सौंदर्य डोळ्यात साठविण्यासाठी रोज होणारी हजारोंची गर्दी याचीच साक्ष आहे.
असे असले तरी गेल्या काही दिवसांत या पर्यटकांसोबतच काही आंबट शौकीन पर्यटकांनीही या ठिकाणी गर्दी करणे सुरू केले आहे. दारूचा मनमुराद आनंद घेण्यासाठी या स्थळाचा हे आंबट शौकीन चांगलाच फायदा करून घेत आहे. केवळ आसपासच्या गावातीलच पर्यटकांचा यात समावेश नाही तर चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांचाही यात समावेश आहे. येताना सोबत दारूचा साठा घेवून येणे, असा नित्यक्रमच या ठिकाणी झाला आहे. दारूच्या या प्रकारामुळे सभ्य आणि महिला पर्यटकांना कमालिचा त्रास सहन करावा लागत तर आहेच, पण त्याचबरोबर घोडाझरी या पर्यटन स्थळाचे पावित्र्यही नष्ट होत आहे. येथे होत असलेली गर्दी लक्षात घेता आणि या प्रकारावर आळा घालण्यासाठी पोलिसांनीच पुढाकार घेण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)