बॉटनिकल गार्डनमुळे विसापूर होणार विकासाचे ‘हब’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 06:00 AM2019-09-22T06:00:00+5:302019-09-22T06:00:35+5:30
आदिवासी व गोरगरिबांना जगण्याचे साधन देणाऱ्या या बॉटनिकल गार्डनमुळे विसापूर आणि सभोवतालची गावे विकासाचे हब म्हणून पुढे येणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची हे गार्डन उभारण्यामागील दूरदृष्टी किती प्रभावी आहे, हे प्रकर्षाने जाणवते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील पाच वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात काही बाबींचा विकास एवढा व्यापक झाला आहे की त्या विकासकामाची ख्याती राज्यभरात होत आहे. बल्लारपूरचे बसस्थानक, ताडोबाचा विकास, बांबू संशोधन केंद्र, वन अकादमी ही अशी काही उदाहरणे आहे. मात्र विसापूर येथे होत असलेले बॉटनिकल गार्डन तर थेट देशभरात नावारुपास येणारे आहे. देशातील अत्याधुनिक असे हे गार्डन असणार आहे. आदिवासी व गोरगरिबांना जगण्याचे साधन देणाऱ्या या बॉटनिकल गार्डनमुळे विसापूर आणि सभोवतालची गावे विकासाचे हब म्हणून पुढे येणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची हे गार्डन उभारण्यामागील दूरदृष्टी किती प्रभावी आहे, हे प्रकर्षाने जाणवते.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री म्हणून घेतलेल्या जबाबदारीमागील दूरदृष्टी सांगणारा प्रकल्प म्हणजे विसापूर येथील बॉटनिकल गार्डन. विदर्भात विशेषत: चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील भौगोलिक क्षेत्र हे उत्तम निसर्ग वन आणि जैव विविधतेने संपन्न आणि समृध्द असे क्षेत्र आहे. या निसर्ग वैभवाला या क्षेत्रामुळे नवसंजीवनी मिळणार आहे. राज्य शासनाच्या १६ जून २०१५ च्या शासन निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विसापूर येथे जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन उभारण्याचा संकल्प केला आहे. सदर प्रकल्पाची योजना राबविण्याकरिता राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था, लखनऊ या संस्थेची या प्रकल्पाच्या तांत्रिक कामात मदत होणार आहे.
तीन विभागात गार्डनची निर्मिती
याप्रकल्पांतर्गत बॉटनिकल गार्डन, कन्झर्वेशन झोन आणि रिक्रिएशन झोन अशा तीन विभागामध्ये उद्यान तयार होत आहे. नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्युट लखनऊ यांच्या मार्फतही बरीच कामे सुरू करण्यात आली. वनस्पती शास्त्रातील आंतरराष्ट्रीय विद्या शाखांचा व्यापक दृष्टिकोन लक्षात घेवून प्रकल्पांतर्गत घटकांची विविध कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.
गार्डनमधील ही कामे आहेत प्रगतीपथावर
तसेच वनविभागामार्फत रोपवन कामे, निरीक्षण पथ, जल व मृद संधारणाची कामे, वॉच टॉवर पूल, रस्ते, जलाशय, सुशोभिकरण, सिमेंट नाला बांध, ट्री हाऊस व इतर कामे प्रगतीपथावर आहेत. जागतिक दर्जाचे इन्स्टिट्युट आपल्या विभागात उभे राहिल्यास त्या भागाच्या सार्वत्रिक उत्कर्षाला सुरूवात झाली आहे.
वनप्रबोधनी देणार अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
वनसंपदा व वनेत्तर क्षेत्रातील जैविक संवर्धन साठा बघण्यासाठी जगभरातील पर्यटक, अभ्यासक, विद्यार्थी या गार्डनला भेट देणार आहेत. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना प्रशिक्षण देण्यासाठी डेहराडून संस्थेप्रमाणे एखादी संस्था जिल्ह्यात असावी, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वाटले. लागलीच त्यांनी चंद्रपूर येथे राष्ट्रीय दर्जाची वनप्रबोधनी उभारण्याचा निर्णय घेतला. आता ही वनप्रबोधनी चंद्रपुरात उभारली जात आहे. तिच्या अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ही वनप्रबोधनीच वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना प्रशिक्षण देणार आहे.
या घटकांचा असणार समावेश
फुलांचे निर्जलीकरण तंत्र व त्याबाबतचे प्रशिक्षण हे या राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था, लखनऊ संस्थेच्या सहभागाचा मुख्य भाग आहे. तसेच सायकॅड हाऊस, हर्बेरियम, बीज संग्रहालय, बोन्साय गार्डन, बोगनवेलिया गार्डन इत्यादी घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी व गरीब लोकांना जगण्याचे साधन निर्माण होणार आहे.
ताडोबातील पर्यटकांना पडेल भुरळ
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक वर्षभर येत असतात. अशातच देशातील अत्याधुनिक बॉटनिकल गार्डन जवळच राहणार असल्याने या वनस्पती उद्यान या देश-विदेशातील पर्यटकांनाही भूरळ घालेल, हे निश्चित. त्यामुळे पर्यटक या गार्डनला आवर्जून भेट देतील. त्या दृष्टीनेच या बॉटनिकल गार्डनचा नाविण्यपूर्ण विकास केला जात आहे.