ब्राऊन शूगरसह दोघांना अटक, दोन लाख पाच हजार ३८० रुपये ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 05:37 PM2017-11-08T17:37:02+5:302017-11-08T17:37:50+5:30
चंद्रपूर : रामनगर पोलिसांनी शहरातील अष्टभूजा वॉर्डातील रमाई नगरात धाड टाकून ब्राऊन शूगरसह मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक केली.
चंद्रपूर : रामनगर पोलिसांनी शहरातील अष्टभूजा वॉर्डातील रमाई नगरात धाड टाकून ब्राऊन शूगरसह मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक केली. यावेळी पोलिसांनी २७ हजार रुपये किमतीचे ३.२१० ग्राम ब्राऊन शूगर, दोन लाख पाच हजार ३८० रुपये रोख, दोन मोबाईल, असा एकूण दोन लाख ४३ हजार ७४९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. राजू विमल धानी (२५) रा. बंगाली कॅम्प, सोनू रमेश साव (२०) अष्टभूजा वॉर्ड अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही कारवाई मंगळवारी रात्री ९ पासून तर मध्यरात्री २.३० वाजेपर्यंत करण्यात आली.
रामनगर पोलिसांना स्थानिक अष्टभूजा वॉर्डात काही तरुण नशा करत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी अष्टभुजा वॉर्डातील सोन रमेश साव याच्या घरी धाड टाकली असता त्याठिकाणी सहा तरुण ब्राऊन शूगरचे सेवन करताना आणि सोनू साव व राजू धानी हे दोन युवक ब्राऊन शूगरची विक्री करताना आढळून आले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरुन ब्राऊन शूगर, दोन लाख पाच हजार ३८० रुपये रोख व दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.
ब्राऊन शूगरचे सेवन करणाऱ्या सहा युवकांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर गुन्हा दाखल करू, अशी माहिती रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक गोतमारे यांनी दिली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार दीपक गोतमारे यांच्या नेतृत्वात एपीआय प्रमोद बानबले प्रमोद कोटनाके, दिनकर धोबे, सुरेश धाडसे, सुरेश कसारे, बालकृष्ण पुलगामकर व अजय गिरडकर, डीबी पथकाचे बंटी बेसरकर, रूपेश पराते, पुरूषोत्तम चिकारे, राकेश निमगडे, अशोक मंजूलकर आदींनी केली.