घोरपडीची शिकार दोघांना अटक
By admin | Published: July 18, 2016 01:39 AM2016-07-18T01:39:17+5:302016-07-18T01:39:17+5:30
मध्य चांदा वनविकास महामंडळाचे झरण वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. ७९ मध्ये घोरपडीची शिकार करताना दोघांना पकडण्यात आले.
वनविकास महामंडळातील प्रकार : मालवाहू वाहनही केले जप्त
कोठारी : मध्य चांदा वनविकास महामंडळाचे झरण वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. ७९ मध्ये घोरपडीची शिकार करताना दोघांना पकडण्यात आले. अटकेत असलेले आरोपी सचिन गेडाम (२१) रा. राळापेठ त. गोंडपिपरी जि. चंद्रपूर व प्रसनेजित मल्लिक (४३) रा. आष्टी ता. चामोर्शी जि. गडचिरोली अशी नावे आहेत.
सचिन गेडाम व प्रसेनजित मल्लिक हे दोघेही मालवाहू वाहनाने बल्लारपूर येथून आष्टीकडे वाहन क्र. एमएच ३३- जी २२०५ ने जात होते. ते रस्त्याने जात असताना झरण जवळील रोडलगत बन विभागाच्या कक्ष क्र. ७९ मध्ये त्यांना घोरपड दिसली. तेथे त्यांनी वाहन थांबवून घोरपडीचा पाठलाग केला. घोरपड आवाक्यात आल्याचे दिसताच त्यांनी लोखंडी रॉडने घोरपडीची शिकार केली. त्यादरम्यान, वनरक्षक ए.एन. गुगलोत व एस.एच. पवार या परिसरात गस्त करीत होते. त्यांना दोन अज्ञात व्यक्ती घोरपडीला मारत असल्याचे दिसले. वनरक्षकांनी आरोपींना घोरपड, लोखंडी रॉड व माल वाहतूक करणाऱ्या वाहनासह पकडले.
सदर प्रकार विभागीय व्यवस्थापक एम.एस. फारूखी, सहा. व्यवस्थापक प्रफुल्ल वाघ, वनाधिकारी निकोडे यांना कळविले. आरोपींवर वन्यजीव अधिनियमाअंतर्गत गुन्ह्याची नोंद करून अटक केली. पूढील तपास वनाधिकारी बी.पी. परदेशी करीत असून आज १८ जुलै रोजी गोंडपिपरी न्यायालयात हजर करणार असल्याचे समजते. या प्रकारामुळे वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांत दहशत पसरली आहे. (वार्ताहर)