चंद्रपूर जिल्ह्यात व्यायाम करीत असलेल्या मुलाला बिबट्याने नेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:07 IST2020-09-09T20:05:49+5:302020-09-09T20:07:03+5:30
गावाशेजारी व्यायाम करत असताना बिबट्याने संस्कार सतीश बुरले (11) रा. कापसी या मुलाला उचलून नेले. घटनेनंतर लगेच नागरिकांनी जंगलात शोध घेतला असता संस्कारचा मृतदेहच आढळून आला.

चंद्रपूर जिल्ह्यात व्यायाम करीत असलेल्या मुलाला बिबट्याने नेले
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गावाशेजारी व्यायाम करत असताना बिबट्याने संस्कार सतीश बुरले (11) रा. कापसी या मुलाला उचलून नेले. घटनेनंतर लगेच नागरिकांनी जंगलात शोध घेतला असता संस्कारचा मृतदेहच आढळून आला. ही धक्कादायक घटना सावली तालुक्यातील कापसी येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.
संस्कार आपल्या मित्रांसोबत नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजताच्या सुमारास फिरायला गेला होता. तो व्यायाम करण्यात मग्न असताना अचानक त्याच्या मागवून बिबट आला आणि त्याला पकडून जंगलात धूम ठोकली.
यावेळी त्याच्या मित्रांनी आरडाओरड केल्याने आजुबाजुचे युवक जमा झाले. घटनेची माहिती गावकऱ्याना देण्यात आली. सर्व गावकरी एकत्र येत जंगलात शोध सुरु केला. काही अंतरावर संस्कारची पॅन्ट दिसली. त्याच परिसरात नागरिकांनी शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती वनविभाग व पोलिसांना देण्यात आली आहे.
घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी असलेली मुले वाघ असल्याचे सांगत होती. मात्र घटनेच्या अवलोकनावरून हा हल्ला बिबट्याचा असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.