बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार
By साईनाथ कुचनकार | Published: February 11, 2024 06:57 PM2024-02-11T18:57:15+5:302024-02-11T18:57:46+5:30
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
चंद्रपूर : वारंवार निवेदन देऊनही सरकार शिक्षकांच्या महत्त्वपूर्ण मागण्याची दखल घेत नसल्याचा आरोप करत विजुक्टाने यावर्षी बारावी बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
जिल्हाध्यक्ष डॉ. प्रवीण चटप, सचिव प्रा. प्रमोद उरकुडे, जिल्हा संघटक प्रा. महेश मालेकर, प्रा. मानकर, प्रा. बारसागडे, प्रसिद्धीप्रमुख प्रा. नामदेव मोरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या आहे मागण्या
२००५ पूर्वी अंशतः अनुदानित शाळांवर रुजू झालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन सुरू करा.
१०, २०, ३० वर्षांनंतर मिळणारे आश्वासित प्रगती योजना शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करा.
अघोषित उच्च माध्यमिकला अनुदानासह घोषित करून अंशतः अनुदानावरील शाळा व कमविला प्रचलित अनुदान सूत्राने १०० टक्के अनुदान द्यावे. विनाअनुदानितकडून अनुदानितमध्ये बदली स्थगिती उठवावी. उपदानाची रक्कम २० लाख करावी, निवृत्तीचे ६० वर्ष करावे. घड्याळी तासिका शिक्षकांचे मानधन वाढवावे, उपप्राचार्यांना वेतनवाढ द्यावी.
शून्य कार्यभाराशिवाय शिक्षकाला अतिरिक्त करू नये
आज धरणे आंदोलन
शिक्षक समस्यांची तीव्रता विचारात घेता सोमवारी (दि. १२) नागपूर येथे शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विजुक्टा जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. प्रवीण चटप, सचिव प्रमोद उरकुडे तथा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.