जिल्ह्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरी कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:28 AM2017-08-03T01:28:47+5:302017-08-03T01:29:36+5:30
ब्रह्मपुरी जिल्ह्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीच्या विविध संघटनांनी पुन्हा रणशिंग फुंकले असून अतिरिक्त सत्र न्यायाधिश व वरिष्ठ दिवाणी न्यायालय तथा अन्य मागण्यांसाठी .....
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी जिल्ह्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीच्या विविध संघटनांनी पुन्हा रणशिंग फुंकले असून अतिरिक्त सत्र न्यायाधिश व वरिष्ठ दिवाणी न्यायालय तथा अन्य मागण्यांसाठी बुधवारी ब्रह्मपुरी शहरात कडकडीत बंद ठेवून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
ब्रह्मपुरी जिल्ह्याच्या मागणीला शासनाकडून गेल्या ३५ वर्षांपासून हुलकावणी मिळत आहे. त्या मागणीसाठी पुन्हा रस्त्यावर उतरून मागणी रेटून धरण्यात आली. ब्रह्मपुरीमध्ये उपविभागीय कार्यालय आहे. मात्र अतिरिक्त सत्र न्यायाधिश व वरिष्ठ दिवाणी न्यायालय तसेच उपप्रादेशिक (आरटीओ) कार्यालय सुरू करावे, या प्रमुख मागण्या अजूनही पूर्ण न झालेल्या नाही. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यावर होणारा अन्याय दूर करावा, या मागण्यासाठी बुधवारी संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. सकाळी १० वाजता हुतात्मा स्मारक येथून शहराच्या प्रमुख मार्गाने उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चात हजारो नागरिक सहभागी होते. मोर्चाचे नेतृत्व विविध संघटनांच्या प्रा. सुभाष बजाज, अॅड. मनोहर उरकुडे, अॅड. गोविंद भेंडारकर, सुधीर सेलोकर, अशोक रामटेके, विनोद झोडगे, सुयोग बाळबुध्दे, स्वप्नील अलगदेवे यांनी केले. यात तालुका बार कॉन्सील, जेष्ठ नागरिक संघटना, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला आदींनी सहभाग घेतला होता.