ब्रह्मपुरी महोत्सव सुरू व्हावा : विजय वडेट्टीवार
By admin | Published: January 22, 2015 12:48 AM2015-01-22T00:48:12+5:302015-01-22T00:48:12+5:30
ब्रह्मपुरी हे पूर्व विदर्भातील महत्त्वपूर्ण शहर आहे. विद्यानगरी म्हणून शहराची सर्वत्र ख्याती आहे. क्रीडा क्षेत्रात या नगराने उंच भरारी मारली आहे.
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी हे पूर्व विदर्भातील महत्त्वपूर्ण शहर आहे. विद्यानगरी म्हणून शहराची सर्वत्र ख्याती आहे. क्रीडा क्षेत्रात या नगराने उंच भरारी मारली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर येथील तरुण गाजत आहेत. बुद्धीची अपूर्व देणगी येथील तरुणांना प्राप्त झाली आहे. हे शहर ‘ब्रिलीयंट’ या सदरात मोडणारे आहे. अशा शहरात ब्रह्मपुरी महोत्सव सुरू होणे अगत्याचे असल्याचे सुतोवाच आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.
ब्रह्मपुरी सिटीझन फोरम व ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने आयोजित सभेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. गाडगे महाराज धर्मशाळेत आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य सुभाष बजाज होते. प्रारंभी सचिव हरिश्चंद्र चोले यांनी वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी जेष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांचे निवेदन आमदार विजय वडेट्टीवार यांना सादर केला.
सत्काराला उत्तर देताना आ. विजय वडेट्टीवार यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, ब्रह्मपुरीतील विविध समस्यांच्या पाढा वाचून ब्रह्मपुरीच्या सर्वांगिण विकासाचे चित्र स्पष्ट केले.
याप्रसंगी ७५ वर्षे पेक्षा जास्त वय असणाऱ्या १५ ज्येष्ठ नागरिकांचा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच काँग्रेस पक्षाचे पंचायत समितीचे अध्यक्ष नेताजी मेश्राम यांचाही सत्कार व स्वागत आ. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गाडगे महाराज धर्मशाळेतील वाचनालयात कवीवर्य कुसमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या योजनेचा आ. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. बाळ गजभिये यांनी केले. आभार नारायण बोकडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)