ब्रह्मपुरी नगरपरिषदेत भाजपाशी असलेले संबंध संपुष्टात
By admin | Published: August 23, 2014 01:42 AM2014-08-23T01:42:24+5:302014-08-23T01:42:24+5:30
जानेवारी २०१४ ला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा कौल जनतेने १० नगरसेवकासह भारतीय जनता पार्टीला व ९ नगरसेवक स्वतंत्र विकास आघाडीला दिला.
ब्रह्मपुरी : जानेवारी २०१४ ला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा कौल जनतेने १० नगरसेवकासह भारतीय जनता पार्टीला व ९ नगरसेवक स्वतंत्र विकास आघाडीला दिला. दोन्हीही पक्षाने ब्रह्मपुरीचा विकास लक्षात घेऊन सत्तास्थापन केली. नगरपरिषदेत विरोधी पक्ष संपुष्ठात आला.
सहा महिन्यापासून भाजपा व स्वतंत्र विकास आघाडीची सत्ता अस्तित्वात होते. परंतु अल्पावधीतच भाजपाचे नगराध्यक्ष रिता दीपक उराडे यांनी आघाडीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना व नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरु केला. त्यामुळे ब्रह्मपुरी शहराच्या विकासकामांना खिळ बसली. आघाडीच्या नगरसेवकांचा व आमजनतेचा विश्वासघात झाला आहे. यामुळे स्वतंत्र विकास आघाडीने ब्रह्मपुरी नगरपरिषदेत सत्तारुढ भाजपाशी असलेले संबंध संपृष्ठात आले असून यापुढे नगरपरिषदेत सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याचे आघाडीचे संयोजक विद्यमान उपाध्यक्ष अशोक भैय्या यांनी पत्रकार परिषदेत घोषना केली आहे.
सत्ता स्थापन करताना विकास कामाकरिता आलेली निधी विभागून खर्च करण्यात येईल, असे ठरले असताना सत्तारुढ भजापाने शब्द पाळला नाही. ब्रह्मपुरी नगरपरिषदेला महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान अंतर्गत सन २०१४-१५ करीता प्रस्तावित लोकपयोगी कामे करण्यासाठी अंमलबजावणी करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांनी कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान केली. परंतु यातील ९२ लाख किंमतीचे विविध कामे यापूर्वी पक्का स्थितीत असून ते उधळून पुन्हा नव्याने त्याच जागेवर कामे करण्याचे निदर्शनास आल्याने या निधीचा दुरुपयोग अध्यक्षांनी केला असल्याचा आरोप अशोक भैया यांनी केला आहे. बाजारभावाप्रमाणे अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या कक्षामध्ये एसी खरेदी करुन लावायला पाहिजे. परंतु अवाजवी दराने एरवी खरेदी करुन अपव्यय केला आहे. पत्रपरिषदेला अॅड. मनोहर उरकुडे, नगरसेवक सतिश हुमने, प्रा. डॉ. दिगांबर पारधी, गणी खान, नगरसेविका खंडाते आदी उपस्थित होते. (वार्ताहर)