ब्रह्मपुरी, सावलीला वादळाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 11:52 PM2018-05-06T23:52:39+5:302018-05-06T23:52:53+5:30
शनिवारी सायंकाळी सावली येथे तर रविवारी सायंकाळी ब्रह्मपुरी शहराला जोरदार वादळाचा तडाखा बसला. वादळाने सावली येथील अनेकांच्या घरांचे छप्परे उडाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी/सावली : शनिवारी सायंकाळी सावली येथे तर रविवारी सायंकाळी ब्रह्मपुरी शहराला जोरदार वादळाचा तडाखा बसला. वादळाने सावली येथील अनेकांच्या घरांचे छप्परे उडाले. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले. तर ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील वाहतूक एका तास वादळी पावसाने पुर्णत: बंद पडली आणि जनजीवन विस्कळीत झाले.
ब्रह्मपुरी येथे रविवारी दुपारी पाच वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे वडसा- ब्रह्मपुरी मार्गावर तब्बल तीन मोठी झाडे उन्मळून पडली. परिणामी एक तास वाहतूक बंद पडली होती. वाहनाच्या रांगा लागल्याने वाहतूक सुरळीत होईल किंवा नाही, याबद्दल वाहनधारक चिंतेत होते. परंतु, ब्रह्मपुरीचे पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांनी लगेच वाहतूक निरीक्षक दोडके, मंढरे व गावकºयांच्या मदतीने झाडे तोडून रस्ता मोकळा केला. त्यामुळे वाहतूक सुरु झाली. जोरदार वादळाने शहरातील वीज ताराही तुटल्या होत्या. त्यामुळे काही काळासाठी वीज पुरवठा खंडीत झाला होता.
तर सावली येथे शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सावली येथे आलेल्या चक्री वादळाने लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यात राजेश रार्इंचवार यांच्या मालकीच्या शिवशक्ती राईस मीलची भींत कोसळून टीनाचे पत्रे उडाले.
राईस मीलची भींत मशिनरीवर कोसळून त्यात अंदाजे दहा ते बारा लाखांचे नुकसान झाले. मीलमध्ये असणारे तांदूळ सुद्धा पावसाने भीजल्याने ते खराब झाले आहे. तर अनेकांच्या घरांचे छप्परे उडाले असून कित्येक ठिकाणी मोठमोठी झाडे कोलमडून पडली. त्यामुळे तालुक्यातील गावांमध्ये रात्रभर वीज पुरवठा खंडीत होता.