ब्रह्मपुरी-वडसा राज्यमार्गाचे वर्षभरापासून भिजत घोंगडे
By Admin | Published: May 7, 2017 12:32 AM2017-05-07T00:32:43+5:302017-05-07T00:32:43+5:30
वडसा व ब्रह्मपुरी ही दोन्ही ठिकाणे महत्त्वपूर्ण आहेत. दररोज या एकमेव राज्य मार्गावरुन अनेक वाहने व हजारो नागरिक वाहतूक करीत असतात.
३०० मीटरचा रस्ता धूळ खात : अनेक प्रवाशांचा जीव मुठीत
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : वडसा व ब्रह्मपुरी ही दोन्ही ठिकाणे महत्त्वपूर्ण आहेत. दररोज या एकमेव राज्य मार्गावरुन अनेक वाहने व हजारो नागरिक वाहतूक करीत असतात. परंतु सुरबोडी गावाजवळ ३०० मीटरचा रस्ता गेल्या वर्षभरापासून रखडलेला असल्याने अनेकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
वडसा - ब्रह्मपुरी या मार्गादरम्यान सुरबोडी गाव आहे. या गावाजवळ गोसीखुर्द कालव्याच्या पुलापासून वडसाकडे ३०० मीटर रस्त्याचे काम वर्षभरापासून रखडलेले आहे. या राज्यमार्गावरुन भिलाई, रायपूर, चंद्रपूर, हैद्राबाद, नागपूर या दिशेने जड वाहनांची रात्रदिवस वाहतूक सुरू असते. तसेच ब्रह्मपुरी व वडसा या शहरांकडे कार्यालयीन कामाकरिता आणि बाजारपेठ, विद्यार्थी, शिक्षक, पालक व आरोग्याच्या दृष्टीने ब्रह्मपुरीत अनेक रुग्ण येत असतात. अशा सर्वांना जीव मुठीत घऊन प्रवास करावा लागत आहे. परिणामी अजूनही संबंधित कंत्राटदाराला जाग का येत नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत संबंधित अधिकाऱ्याला विचारणा केली असता त्यांनी कंत्राटदारावर प्रश्न चिन्ह निर्माण केले. कंत्राटदार ऐकत नाही. उलट याबाबत हात वर केल्याचे बोलत असल्याने विभागासमोरही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून हा रस्ता पूर्णत्वास न्यावा, अशी मागणी अनेकांनी केली आहे. या रोडवरुन जाताना धुळीने पूर्ण रस्ता दिसेनासा होत असतो. त्यामुळे अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. तसेच महिला व बालकांच्या डोळ्यात व श्वसनक्रियेत धूळ जात असल्याने आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वडसा - ब्रह्मपुरी राज्यमार्गात रखडलेले ३०० मीटरचे काम पूर्ण करावे, अशी हजारो नागरिकांची मागणी आहे.