कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे ब्रह्मपुरीकर चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 05:00 AM2020-09-13T05:00:00+5:302020-09-13T05:00:23+5:30
शहरात व तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरात आजघडीला १५५ तर ग्रामीण भागात १४१ असे एकूण २९६ रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत. तर तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. ही वाढती कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : शहरात तसेच तालुक्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील कोणताही भाग आजघडीला सुरक्षित नाही. त्यामुळे ब्रम्हपुरी शहरात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी करण्यात येत आहे. शहरात व तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरात आजघडीला १५५ तर ग्रामीण भागात १४१ असे एकूण २९६ रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत. तर तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. ही वाढती कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागभीड येथील तहसीलदार यांनी यासंदर्भात लवकरच पाऊल उचलावे, अशीही मागणी आहे.
लक्षणे दिसून येताच त्वरित तपासणी करा
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता ब्रम्हपुरी तालुक्यातील नागरिकांनी कोरोना संदर्भात अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तपासणीला अधिक उशीर केल्यास धोकाही अधिक संभवतो. उशिरा तपासणीमुळे कोरोना विषाणूचा संचार फुफ्फुसात होऊन त्याचा फुफ्फुसावर विपरित परिणाम होतो. संसर्गाची लक्षणे आढळताच तत्काळ तपासणी करा व संभाव्य धोक्यापासून स्वत:ला दूर ठेवा, असे कळकळीचे आवाहन उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी केले आहे.
अॅन्टिजेन तपासणीला घाबरू नका
लक्षणे आढळताच तपासणी करावी. मात्र बऱ्याच व्यक्ती शेवटच्या टप्प्यात तपासणीसाठी पुढे येतात. त्यामुळे धोका वाढतो. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून ताप, खोकला, घसा खवखवणे व तोंडाची चव जाणे, अशी लक्षणे आढळताच तत्काळ अॅन्टिजेन चाचणी करून घ्या. घाबरू नका. ताप अंगावर काढू नका, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न
ब्रह्मपुरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र प्रशासनाला नागरिक अजिबात सहकार्य करीत नाहीत. तरीसुद्धा प्रशासन आपले काम जबाबदारीने करीत आहे. नागरिकांनीही स्वत: सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा नियमित वापर करावा. आजारी व्यक्तीने आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. चाचणी करून पहिल्या टप्प्यातच कोरोनाचा नायनाट करा, असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.