कऱ्हांडल्याचा ‘जय’चा ब्रह्मपुरीत तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2016 12:41 AM2016-07-21T00:41:37+5:302016-07-21T00:41:37+5:30
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याची शान ठरलेला ‘जय’ हा वाघ मागील तीन महिन्यांपासून अभयारण्यातून गायब आहे.
पत्रके वाटली : पत्ता सांगणाऱ्यास मिळणार बक्षीस
नागभीड : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याची शान ठरलेला ‘जय’ हा वाघ मागील तीन महिन्यांपासून अभयारण्यातून गायब आहे. त्याचा शोध नागभीड व चिमूर तालुक्यातील जंगलात एका वन्यजीव संस्थेकडून अतिशय गुप्तपणे घेतल्या जात आहे. मात्र अद्यापही ‘जय’चा कोणताही मागमुस लागलेला नाही, अशी विश्वसनीय माहिती आहे.
जय २०१३ मध्ये उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात आला होता. तेव्हापासून तो तेथेच राहत असला तरी कधी कधी तो या अभयारण्याच्या बाहेर आसपासच्या जंगलात जायचा. गेल्या तीन वर्षात जय ने स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली होती. त्याला पाहण्यासाठी अगदी दूरवरून पर्यटक या अभयारण्यात खास येत होते. त्याच्या ओळखीसाठी त्याला दोनदा रेडियो कॉलर लावण्यात आली.
१८ मार्च २०१६ रोजी त्याला शेवटची रेडियो कॉलर लावण्यात आली. पण ती सुद्धा बंद पडली आणि तो तेव्हापासूनच गायब असल्याची माहिती आहे. जयच्या गायब होण्याने वनविभागात चांगलीच खळबळ माजली आणि वन विभागाकडून जयचा शोध सुरू झाला. तो तपास अद्यापही सुरूच आहे.
जयच्या तपासासाठी वन्यजीव संस्थांचीही मदत घेण्यात आली आहे. या संस्थांपैकी एक असलेली ‘वाईल्ड लाईफ कंझरवेशन अॅड डेव्हलपमेंट सेंचुरीज’ ही संस्था नागभीड, ब्रह्मपुरी आणि चिमूर तालुक्यातील जंगलात या वाघाचा शोध घेत आहे. या संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याने येथील काही वन्यजीव अभ्यासकांना सोबत घेवून भंडारा जिल्ह्यातील चांदी-चन्नेवाडा, नागभीड तालुक्यातील गायमुख जंगल परिसर, सातबहीणी डोंगर परिसर हा भाग पिंजून काढला. पण या तपासात जयचा कोणताही मागमुस आढळून आला नाही. (तालुका प्रतिनिधी)