१८ दिवसांच्या मुलीवर मेंदूची शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:33 PM2019-02-18T22:33:08+5:302019-02-18T22:33:24+5:30
एका पाच दिवसांच्या बालिकेला जन्मापासूनच मेंदूचा दुर्मिळ आजार झाला. मेंदूचा वरचा भाग मणक्यातून शरिराच्या बाहेर आला होता. अशा जर्जर अवस्थेत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती झालेल्या या चिमुकलीवर तेथील डॉक्टरांनी ती १८ दिवसांची झाल्यानंतर यशस्वी शस्त्रक्रिया करीत तिला जीवदान दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : एका पाच दिवसांच्या बालिकेला जन्मापासूनच मेंदूचा दुर्मिळ आजार झाला. मेंदूचा वरचा भाग मणक्यातून शरिराच्या बाहेर आला होता. अशा जर्जर अवस्थेत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती झालेल्या या चिमुकलीवर तेथील डॉक्टरांनी ती १८ दिवसांची झाल्यानंतर यशस्वी शस्त्रक्रिया करीत तिला जीवदान दिले.
पूर्वी दुर्मिळ आजार असणाऱ्या रूग्णांना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात येत होते. आता अशा रूग्णांची शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे करणे शक्य झाले आहे. त्याचीच प्रचिती उपरोक्त उदाहरणावरून झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथील सोनाली व खुशाल कांबळे यांची पाच दिवसांची चिमुकली २५ डिसेंबर २०१८ ला या रूग्णालयात भरती झाली. ती जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथील भरती असतानाच तिला हा आजार जडल्याचे लक्षात आले होते. या आजारात मेंदूचा वरचा भाग मणक्यातून शरिराच्या बाहेर येतो व सोबतच डोक्याचा आकार तीन ते चार पट वाढून जातो. बाळाचे डोके नीटपणे सांभाळता येत नाही. बाळाला साधारण आयुष्य जगता येत नाही व अशा परिस्थितीत बाळ मतिमंद होण्याचा जास्त धोका असतो. सदर शस्त्रक्रियेसाठी बालरोग विभागाचे समाजसेवा अधिक्षक तानाजी शिंदे यांनी समुपदेशन केले.
सदर मुलीला चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. येथील प्रसिद्ध ब्रेन स्पाईन शल्य चिकित्सक डॉ. शार्दुल वरगंटीवार, भुलतज्ज्ञ डॉ. किरण जान्हवे व चमू यांच्या प्रयत्नाने सदर चिमुकलीवर जन्माच्या अठराव्या दिवशी म्हणजे ०८ जानेवारी २०१९ रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हा बाळाचे वजन १९०० ग्रॅम होते. शस्त्रक्रियेनंतर सुटीच्या दिवशी बाळाचे वजन २४०० ग्रॅम झाले. बालरोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एम. जे. खान व इतर डॉक्टरांच्या सल्ल्याने नवजात शिशु कक्षात भरती करण्यात आले. त्यानंतर दुसरी शस्त्रक्रिया २५ जानेवारी २०१९ रोजी करण्यात आले. यात मेंदूत नळी टाकून मेंदूतील पाणी बाहेर काढून डोक्याचा आकार कमी करण्यात आला. या संपुर्ण प्रक्रियेत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांचे मार्गर्दान लाभले.