७३ आदिवासी विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शिक्षणाला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 05:00 AM2020-06-02T05:00:00+5:302020-06-02T05:01:22+5:30
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सन २०१०-११ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये दरवर्षी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यात येते. सत्र सुरु होण्याच्या पूर्वी अर्ज मागणविण्यात येतात. त्यानुसार कागदपत्राची तपासणी केल्यानंतर त्यांना संबंधित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश देण्यात येतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये पहिली व दुसरीत शिक्षण देण्याच्या योजनेला २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे चिमूर व चंद्रपूर प्रकल्पातील सुमारे ७३ विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सन २०१०-११ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये दरवर्षी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यात येते. सत्र सुरु होण्याच्या पूर्वी अर्ज मागणविण्यात येतात. त्यानुसार कागदपत्राची तपासणी केल्यानंतर त्यांना संबंधित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश देण्यात येतो. त्यानुसार चिमूर प्रकल्पातील ६१ व चंद्रपूर प्रकल्पातील १२ असे एकूण ७३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. कोरोना रोगाच्या साथीच्या पार्श्वभूमीवरील वित्त विभागाच्या सूचना लक्षात घेता कोणत्याही अतिरिक्त निधी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याच्या योजनेसाठी उपलब्ध होणार नाही. ही शक्यता लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाकडून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षामध्ये नवीन शाळेची निवड करण्यात येणार नसून तसेच या पूर्वी निवडलेल्या शाळांमध्येही नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये, आदिवासी विकास आयुक्त व प्रकल्प अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. शैक्षणिक वर्षामध्ये या योजनेंतर्गत आतापर्यंत निवडलेल्या शाळांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रवेश व शिक्षण पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत.
आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय
आदिवासी विद्यार्थ्यांचे इंग्रजी शिक्षणांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना सदर योजना सोईची होती. मात्र आता कोरोना बजेटचा विचार करता सदर योजनेला सन २०२०-२०२१ या शैक्षणिक सत्रासाठी स्थगिती देण्यात आली. त्यामुळे पालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
चिमूर प्रकल्पातंर्गत ६१ विद्यार्थी आहेत. ते विद्यार्थी जांभूळघाट येथे शिक्षणासाठी जाण्यास तयार असतील. तर त्यांची तेथे व्यवस्था करण्यात येईल.
- केशव बावणकर,
आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चिमूर