कोळशाच्या धुळीने गुदमरतोय श्वास
By admin | Published: May 20, 2014 11:32 PM2014-05-20T23:32:56+5:302014-05-20T23:32:56+5:30
गावालगत असलेल्या कोळसा खाणीमुळे धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात परसले आहे. त्यामुळे गोयेगाव वासियांचे आरोग्य धोक्यात आले असून गावकर्यांना वेकोलिच्या कोळसा खाणींचा फटका बसत आहे.
प्रकाश काळे - हरदोना
गावालगत असलेल्या कोळसा खाणीमुळे धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात परसले आहे. त्यामुळे गोयेगाव वासियांचे आरोग्य धोक्यात आले असून गावकर्यांना वेकोलिच्या कोळसा खाणींचा फटका बसत आहे. प्रचंड प्रमाणात उडणारी कोळशाची धूळ नागरिकांच्या जिवावर बेतणारी आहे. परिसरातील नागरिक विविध आजाराने त्रस्त आहे. कायमस्वरुपी बंदोबस्त न केल्यास भविष्यात चित्र कसे राहील, याचा विचार न केलेलाच बरा. राजुरा येथून १२ किमी अंतरावर गोयेगाव दोन हजार लोकसंख्येच गाव आहे. या गावात जाण्यासाठी मुख्य मार्गावर वळण वाटेने प्रवास करावा लागतो. या परिसरात कोळशाचे मोठ्या प्रमाणात साठे असल्याने वेकोलिने कोळसा उत्खननासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करुन कोळसा खाण सुरू केली आहे. गोयेगावापासून कोळसा खाण अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे कोळशाच्या धुळीने गाव माखले आहे. कोळसा खाणीलगत गाव आणि शेती असल्याने पिकांवर काळ्या धुळीचा थर बसून पीक पूर्णत: खराब होते. त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक फटकाही बसत आहे. धुळीमुळे शेतात काम करण्यासाठी मजूरसुद्धा भेटत नसल्याची स्थिती परिसरातील शेतकर्यांची आहे. शेतकर्यांकडे शेती असूनही पीक घेता येत नाही. अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. वेकोलितर्फे कोळसा उत्खननासाठी शक्तिशाली ब्लॉस्टिंग केली जाते. ही ब्लॉस्टिंग एवढी जबरदस्त असते की, भूकंप आल्यागत धक्के बसतात. नवीन इमारत बांधकामांना अल्पावधीतच तळे जात आहे. त्यामुळे बांधकाम प्रभावित झाले आहे. उडणार्या कोळशाच्या धुळीने यावर्षी शेतपिकांची पुरती वाट लागली. वेकोलिने कोळसा वाहतुकीसाठी काढलेला रस्ता शेतालगत असल्याने उडणारी धुळ शेतपिकांवर बसल्याने पिके पूर्णत: खराब होत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी उत्पन्नात मोठ्या प्रमाणातत घट झाली आहे. कोळशाच्या धुळीचा चक्क थर पिकांवर जमा झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. यावर्षी निसर्गाचा प्रकोप आणि गोवरी डीप कोळसा खाणीच्या धुळीची त्यात भर पडली. उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी शेतकर्यांची अवस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणात धुळ उडत असताना वेकोलिकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. वर्षाकाठी करोडो रुपयांचा नफा मिळविणार्या वेकोलिला गावकर्यांच्या समस्येशी काहीही देणेघेणे नाही. गोयेगावाच्या अगदी हाकेच्या अंतरावर ‘गोवरी डीप’ कोळसा खाण आहे. वेकोलित पाण्याचा प्रचंड उपसा केला जातो. त्यामुळे घरगुती हातपंपाना पाण्याअभावी अखेरची घरघर लागली आहे. गावात पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आहे. परंतु पाण्याचा कमतरतेने नागरिकांना मुबलक पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे. पाण्ययाची टाकी अर्धीअधिक रिकामीच राहते. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दिवसागणिक कोळसा खाणींमुळे पाण्याचे स्त्रोत आटत चालल्याने भविष्यात येथी पाणी टंचाई निर्माण होणार आहे. वेकोलिने किमान दोन ते तीन वेळा रस्त्यावर पाणी शिंपडून धुळीवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.