बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 05:44 AM2024-05-08T05:44:06+5:302024-05-08T05:44:21+5:30
तक्रारदाराने नोव्हेंबर २०२३ मध्ये परवान्यासाठी अर्ज केला. मात्र अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खरोडे यांच्याकडून परवाना देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बीअर शाॅपीच्या परवान्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी मंगळवारी चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्यासह दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खाताड हे तीन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. नागपुरातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. तिघांवरही रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात गुन्हा दाखल होण्याची कारवाई सुरू होती, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक मंजूषा भोसले यांनी दिली.
तक्रारदाराने नोव्हेंबर २०२३ मध्ये परवान्यासाठी अर्ज केला. मात्र अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खरोडे यांच्याकडून परवाना देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात होती. दरम्यान, खरोडे यांनी परवाना मंजूर करण्यासाठी स्वत:सह अधीक्षक संजय पाटील यांच्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली.
गोंदियातही कारवाई, तहसीलदारावर गुन्हा
गोंदिया : जप्त केलेला रेतीचा टिप्पर सोडण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करणाऱ्या गोरेगावचे तहसीलदार, एक नायब तहसीलदार व एका खासगी व्यक्ती विरुद्ध गोंदियाच्या लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी कारवाई केली. तहसीलदार किसन भदाणे, नायब तहसीलदार नागपुरे व तहसील कार्यालयातील संगणक चालक गणवीर या तिघांनी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली आहे.